गाव कारभारींच्या कर्तृत्वाचा ‘लोकमत’तर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:36 AM2019-03-01T00:36:17+5:302019-03-01T00:37:06+5:30
नाशिक : पंचायतराज व्यवस्थेत ग्रामविकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आणि लोकशाहीच्या मजबुतीकरणात मोलाची भूमिका निभावणाऱ्या जिल्ह्यातील १३ सरपंचांच्या कार्यकर्तृत्वाचा ‘लोकमत’च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. गुरुवारी (दि. २८) हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंचांच्या जबाबदाऱ्या आणि हक्क यासह गावाच्या मूलभूत विकासावर मंथन झाले.
नाशिक : पंचायतराज व्यवस्थेत ग्रामविकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आणि लोकशाहीच्या मजबुतीकरणात मोलाची भूमिका निभावणाऱ्या जिल्ह्यातील १३ सरपंचांच्या कार्यकर्तृत्वाचा ‘लोकमत’च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. गुरुवारी (दि. २८) हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंचांच्या जबाबदाऱ्या आणि हक्क यासह गावाच्या मूलभूत विकासावर मंथन झाले.
अनेक गावं आता स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गावागावांत होणाºया विकासकामांची नोंद घेत त्यासाठी झटणाºया सरपंचांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने लोकमतने मागील वर्षापासून ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ उपक्रम सुरू केला असून, सलग दुसºया वर्षी या उपक्रमास जिल्ह्यातील सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर पतंजली सहप्रायोजक होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी मंत्री व निवड समितीचे अध्यक्ष विनायकदादा पाटील, विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, बीकेटीचे महाराष्टÑातील अॅग्री सेलचे सहाय्यक व्यवस्थापक जुबेर शेख, अधिकृत वितरक सूरज धूत, मालेगावचे वितरक वीरेंद्र राका, सुयोजित ग्रुपचे संचालक आकाश जैन आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील जयंत पाटील तसेच महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने म्हणाले, सरपंचांना त्यांनी केलेल्या कामाची पावती देण्याचा लोकमतचा हा उपक्रम स्तुत्य आहे. राज्यात जनकल्याणाच्या १६० योजना आहेत, त्या सर्वांची सरपंचांना माहिती नसते यासाठी जिल्हा परिषदेमार्फत या सर्व योजनांची माहिती असलेले एक हॅण्डबुक तयार करून ते ग्रामसेवकांकडे दिल्यास नवनिर्वाचित सरपंचांना ते ग्रामसेवकांमार्फत देता येईल. यामुळे सरपंचांनाही काम करणे सोपे होईल.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. म्हणाले, गावाचा विकास झाला तर राज्याचा विकास होईल. गाव-पातळीवरच्या शेवटच्या माणसापर्यंत शासकीय योजना पोहचविण्याची महत्त्वाची जबाबदारी सरपंचांवर असते. अडचणींच्या काळात तर ही जबाबदारी अधिक वाढते. यासाठी सरपंचांना त्यांची जबाबदारी आणि अधिकार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
बीकेटीचे जुबेर शेख यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत उत्कृष्ट कार्य करणाºया सरपंचांना पुरस्कृत करण्याची लोकमतची भूमिका कौतुकास्पद असल्याचे सांगितले. बीकेटीतर्फे करण्यात येणाºया उत्पादनांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
प्रास्ताविक लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले. शहरांबरोबच गावंही स्मार्ट व्हायला हवीत त्यासाठी गावोगावचे सरपंच काम करत आहेत. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत अशा प्रकारे पे्ररणादायी व उत्कृष्ट कार्य करणाºया लोकप्रतिनिधींना गौरविण्याची आणि त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका लोकमतची असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी आभार मानले.
प्रारंभी कलानंद संस्थेच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन रेडिओ जॉकी भूषण मटकरी यांनी केले. कार्यक्रमास जिल्हाभरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते.गावं स्मार्ट झाली तर देश स्मार्ट होईलनिवड समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी यावेळी आपल्या काळातील आठवणींना उजाळा देत सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे होत असलेले बदल हे सकारात्मक असल्याचे सांगितले. पूर्वी अधिकारी ‘रिअॅक्ट’ व्हायचे आता अधिकारी ‘अॅक्ट’ व्हायला लागले आहेत, हा चांगला बदल असल्याचे ते म्हणाले. सरपंचपद किंवा ग्रामपंचायत म्हणजे राजकारणाची बालवाडी आहे आणि म्हटले तर तीच पीएच.डी. ही आहे. शहर स्मार्ट झाली तर ती विकासाची बेटं होतील, मात्र गावं स्मार्ट झाली तर देश स्मार्ट होईल त्या दृष्टीने सरपंचांनी विकासाची कामं करावीत, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी, पंचायतराज बळकटीकरणासाठी सरपंच हा महत्त्वाचा घटक असून, त्यांनी नियोजन करून विकासकामे केली तर गावं समृद्ध होतील, असे सांगितले.