पाचदिवसीय गणपतींसह  गौरींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:20 AM2018-09-18T01:20:10+5:302018-09-18T01:20:48+5:30

Gauri's immersion with five days Ganpati | पाचदिवसीय गणपतींसह  गौरींचे विसर्जन

पाचदिवसीय गणपतींसह  गौरींचे विसर्जन

Next

नाशिक : गणेशोत्सव रंगात आला असून, शहरात विविध सार्वजनिक मंडळांकडून धार्मिक-पौराणिक व सामाजिक देखावे सादर करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा सोमवारी (दि.१७) पाचवा दिवस होता. काही नागरिकांनी पाच दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पांसह गौरींनाही भावपूर्ण निरोप दिला.
गणरायाचा उत्सव नाशिककरांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त शहरात मंगलमय वातावरणाची निर्मिती झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यातून बाप्पांच्या विविध भक्तिगीतांसह आरतीचा आवाज संध्याकाळी कानी पडत आहे. यामुळे वातावरणात प्रसन्नता जाणवू लागली आहे. गणरायाचा उत्सव यंदा अकरा दिवस असला  तरी परंपरेनुसार काही भाविकांच्या घरी दीड दिवस, पाच दिवसांकरिताही बाप्पा विराजमान झाले होते. अशा नागरिकांनी सोमवारी विधिवत बाप्पांच्या मूर्तीची आरती करून पाण्यात विसर्जन केले. यावेळी शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, पंडित कॉलनी, सिडको, इंदिरानगर आदी भागांमध्ये बहुतांश गणेशभक्तांनी मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करत दान केले. शहरातील गंगापूररोड जवळील हनुमानवाडी लिंकरोडच्या पुलाला लागून गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाकडून गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आला होता. यावेळी बहुतांश नागरिकांनी संकलनाला चांगला प्रतिसाद देत मूर्तींचे दान करणे पसंत केले. यामुळे गोदामाईचे जलप्रदूषण रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली. तसेच पंडित कॉलनीमध्ये लायन्स क्लबकडूनदेखील मूर्ती संकलन करण्यात आले. लायन्स क्लब सभागृहात संस्थेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्वागत करत प्रतिसाद दिला.
शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्साह
शहरातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये पाचदिवसीय गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोषात शाळेच्या आवारातून मिरवणूक काढत वाजतगाजत लाडक्या बाप्पांना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घातली. यावेळी विद्यार्थ्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला.
 

Web Title: Gauri's immersion with five days Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.