नाशिक पश्चिममध्येही गावठाण स्पिरीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:34 AM2019-08-31T01:34:02+5:302019-08-31T01:34:18+5:30

नाशिक : वेगळा मतदारसंघ होण्यापासून आणि नंतरही सातत्याने ‘बाहेरील’ उमेदवारच सिडकोचा लाभ उठवून निवडून येत असल्याने यंदाच्या निवडणुकीत गावठाण ...

 Gauthan Spirit in Nashik West | नाशिक पश्चिममध्येही गावठाण स्पिरीट

नाशिक पश्चिममध्येही गावठाण स्पिरीट

Next


नाशिक : वेगळा मतदारसंघ होण्यापासून आणि नंतरही सातत्याने ‘बाहेरील’ उमेदवारच सिडकोचा लाभ उठवून निवडून येत असल्याने यंदाच्या निवडणुकीत गावठाण अस्मिता जागृत करण्यास प्रारंभ झाला आहे. मध्य नाशिकच्या धर्तीवर याठिकाणी देखील असलेल्या विविध गावठाणात अनेक प्रबळ दावेदार असल्याने स्थानिक उमेदवारच हवा अशाप्रकारची चर्चा फिरवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वास्तव्यासाठी आलेल्या किंवा येथे वास्तव्यास नसलेल्या दावेदारांची मात्र अडचण होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांच्या दावेदारीसाठी अनेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या जात आहेत. साधारणत: निवडणुकीची समीकरणे मांडताना त्या मतदारसंघात आपल्या गावातील किंवा समाजाचे किती लोक आहेत हे अनेक जण आवर्जुन सांगतात. सिडकोत कसमा आणि खान्देश म्हणजे धुळे आणि जळगाव येथील रहिवासी प्रामुख्याने असल्याने खान्देशी मतदार निर्णायक मानले गेले आहेत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेआधी म्हणजेच २००९ पूर्वी मतदारसंघात भाजपाचे डॉ. दौलतराव आहेर किंवा नंतर कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी याच जोरावर नेतृत्व केले; परंतु २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर देखील बाहेरील उमेदवारांनीच नेतृत्व केले.
२००९ पूर्वी सिडको वगळला तर सातपूरचा बहुतांशी भाग तत्कालीन नाशिकरोड-देवळाली मतदारसंघाशी जोडलेला होता. मात्र, पुनर्रचनेत सिडको-सातपूर एकच मतदारसंघ झाला आहे. यात स्थानिक गावठाणे म्हणजे मोरवाडी, उंटवाडी, कामटवाडे, पाथर्डी, अंबड, सातपूर, चुंचाळे, पिंपळगाव बहुला, आनंदवल्ली, गंगापूर यांचा समावेश आहे. याशिवाय ५५ लहान-मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. आत्तापर्यंतचे उमेदवार हे बाहेरून येतात आणि सिडको सातपूरवर वर्चस्व गाजवत असल्याने त्यानिमित्ताने आता गावठाण अस्मिता जागृत झाली आहे. सध्या या मतदारसंघातून दिनकर पाटील, विलास शिंदे, दिलीप दातीर, नाना महाले, अण्णा पाटील, अनिल मटाले हे मूळ गावठाणातील अनेक दावेदार आहेत.
यातील अनेक जणांनी गावठाण भागात बैठकादेखील घेतल्या आहेत. त्यातून गावठाण स्पिरीट वाढवितानाच स्थानिक उमेदवारच हवा, असे संदेश पक्षाला देण्यास प्रारंभ केला आहे. अर्थात, या सर्वांत भाजपाचे दिनकर पाटील यांनी मात्र गावठाण संपर्कात आघाडी घेऊन प्रबळ दावेदारी केली आहे. इच्छुकांमध्ये सर्वांत आधी तयारीला लागलेल्या पाटील यांनी सर्व भागांत संपर्क मोहिमा राबविल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी दिनकर पाटील यांनी या मतदारसंघात सर्वाधिक संपर्क साधून प्रचार केला आणि त्यानिमित्ताने स्वत:चादेखील प्रचार करून घेतला आहे. सातपूरमधील गंगापूर गाव हे त्यांचे मूळ गाव असले तरी सातपूरबरोबरच सिडकोतदेखील त्यांनी विविध कार्यक्रमांतून संपर्क वाढविला आहे.
पक्षातील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातदेखील गावठाण स्पिरीट जागृत झाले असून त्याचा अभिनिवेश निर्माण केला जात असला तरी पक्ष त्याबाबत नक्की काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागून आहे. विशेषत: कोणत्याही मतदारांना न दुखावता उमेदवारीबाबत निर्णय घेताना राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे.

Web Title:  Gauthan Spirit in Nashik West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.