गावठाणातील प्रभाग होणार छोटे
By admin | Published: September 8, 2016 01:44 AM2016-09-08T01:44:23+5:302016-09-08T01:44:35+5:30
प्रारूप प्रस्ताव सादर : त्रिसदस्यीय समिती करणार तपासणी
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप तयार झाले असून, त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीला सादर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बाह्य विभागातील प्रभाग सुमारे ४३ ते ४८ हजार लोकसंख्येचे तर गावठाणाचे प्रभाग त्यापेक्षा कमी लोकसंख्येचे छोटे राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होते. त्यासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीचीही स्थापना करण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या कामकाजाबाबत अतिशय गोपनीयता पाळण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रभाग रचनेचे प्रारूप दि. ७ सप्टेंबरपर्यंत तयार करून ते विभागीय आयुक्तांना सादर करावयाचे होते. त्यानुसार, महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने रात्री उशिरा प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच प्रभाग रचना तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सर्वसाधारणपणे ४३ हजार लोकसंख्या केंद्रबिंदू मानून प्रभाग रचना तयार करण्यात आलेली आहे.
भौगोलिक स्तरानुसार काही प्रभागात दहा टक्के जास्त तर काही प्रभागात १० टक्के कमी लोकसंख्येनुसार प्रभागांच्या सीमा निश्चित केल्या आहेत. (प्रतिनिधी)