पाथरे येथील गवळी कुटुंबाने दिला पक्ष्यांना आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:31 PM2020-04-16T20:31:20+5:302020-04-17T00:29:07+5:30
पाथरे : कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारेगावमध्ये कोरोनाग्रस्त आढळल्याने परिस्थिती गंभीर आहे.
पाथरे : कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारेगावमध्ये कोरोनाग्रस्त आढळल्याने परिस्थिती गंभीर आहे. अशातच उष्णतेचा तडाखा वाढत आहे. अंगाची काहिली होत आहे. अशा परिस्थितीत सर्व माणसे आता घरातच बसून आहेत, परंतु पशु-पक्षी यांची अन्ना-पाण्यासाठी वणवण होत आहे. पर्यावरणाचा वाढता ºहास, बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचीही संख्या घटत आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने पशु-पक्षी यांच्याकडे बघितले पाहिजे. हा उद्देश ठेवून मनोज गवळी यांनी टाकाऊ वस्तूंपासून घरटे बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सध्याच्या फावल्या वेळेचा उपयोग करून त्यांनी घरटी बनविली आहे. पक्ष्यांची तहान-भूक यातून भागविली जाणार आहे. व्यवसायाने दुकानदार असलेले गवळी हे सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे घरातच बसून आहे. परंतु पशु-पक्ष्यांनाही अन्नधान्याची गरज असते हा विचार ठेवून त्यांनी घरबसल्या या घरट्यांची निर्मिती केली आहे. या घरट्यांमध्ये पाणी, धान्य ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने उचलली आहे. जास्तीत जास्त पक्ष्यांना विश्रांती घेता यावी तसेच त्यांना पाणी व चारा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला असल्याचे गवळी यांनी सांगितले. त्यामुळे सध्या दुर्मीळ झालेल्या पक्ष्यांचा चिवचिवाट या घरट्याजवळ येईल आणि त्यातून समाधान मिळेल, असा आशावाद गवळी यांनी व्यक्त केला आहे.