आले साहेबाच्या मना...!
By admin | Published: December 3, 2015 10:41 PM2015-12-03T22:41:05+5:302015-12-03T22:41:41+5:30
मनमाड : जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने नागरिकांचा हिरमोड
मनमाड : गिरणाडॅम येथे बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी मनमाड शहराला भेट देणार असल्याने पालिकेच्या वतीने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र पाणी टंचाई, आरोग्य,रस्ते आदी समस्यांनी त्रस्त झालेले मनमाडकर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचन्यासाठी ताटकळत पाच तास वाट पहात असताना त्यांचा दौरा रद्द झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. आले साहेबाच्या मना...तेथे कोणाचे चालेना ...याचा प्रत्यय आज मनमाडकरांनी अनुभवला.
नाशिकचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशावह हे आज गुरुवारी नांदगाव तालुक्यात गिरणाडॅम येथील बैठक आटोपून मनमाड शहराला भेट देण्याचे नियोजन होते. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पालिकेने केलेले काम तसेच आरोग्य , पाणीटंचाई , रस्ते आदी कामांचा आढावा ते घेणार होते.साहेबांच्या आगमनामुळे शहरातील पालिका परिसरातील रस्ते चकाचक झाले होते.गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई ,स्वच्छता व आरोग्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या मनमाडकरांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या वृत्तामुळे दिलासा मिळाला . आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी नागरिकांसह काही पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या प्रतिक्षेत होते.शहरातील अतीक्रमणे , पालखेडच्या पाण्याच्या रोटेशनची मागणी आदी समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येणार होती.तब्बल पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजल्याने मनमाडकरांचा हिरमोड झाला. (वार्ताहर)