बचतीचा मंत्र देणाऱ्या गेडामांच्या हवाईवाऱ्या

By admin | Published: September 9, 2016 01:31 AM2016-09-09T01:31:47+5:302016-09-09T01:32:45+5:30

नऊ वेळा विमान प्रवास : माहिती अधिकारातून ‘असाही’ प्रवास समोर

GEDAM flights | बचतीचा मंत्र देणाऱ्या गेडामांच्या हवाईवाऱ्या

बचतीचा मंत्र देणाऱ्या गेडामांच्या हवाईवाऱ्या

Next

नाशिक : महापालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना बचतीचा मंत्र देणारे माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या उण्यापुऱ्या वीस महिन्यांच्या कालावधीत मनपाच्या खर्चातून तब्बल नऊ वेळा हवाईवाऱ्या केल्याचे माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून समोर आले आहे. स्मार्ट आयुक्तांचा हा स्मार्ट प्रवास इथवरच थांबलेला नाही तर गेडाम यांनी मनपाच्या वाहनातून ३६ हजार कि.मी.चा प्रवासदेखील केला आहे. गेडाम यांनी कार्यालयीन कामकाजासाठीच हा हवाई प्रवास केला असला तरी सदस्यांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या गेडाम यांना रेल्वे अथवा रस्ते मार्गानेही प्रवास करून आदर्श प्रस्थापित करता येऊ शकला असता.
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार डॉ. प्रवीण गेडाम यांनी १० नोव्हेंबर २०१४ रोजी स्वीकारला आणि तीन वर्षांच्या मुदतीची वाट न पाहता राज्य सरकारने २० महिन्यांच्या कारकीर्दीनंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांची उचलबांगडी केली. गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीबद्दल विविध उपाययोजना करत शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला. नगरसेवकांच्या विकास निधीत कपात केली. अनेक विकासकामांना कात्री लावली. दरवेळी होणाऱ्या महासभांमध्ये गेडाम यांनी सदस्यांना आर्थिक गणित समजावून सांगत बचतीचा मंत्रही दिला. मात्र, याच गेडाम यांनी आपल्या वीस महिन्यांच्या उण्यापुऱ्या कालावधीत दिल्ली, हैदराबाद आणि नागपूर येथे जाण्यासाठी हवाई मार्गाला पसंती दिल्याचे माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार समोर आले आहे. नागपूर येथे कुंभमेळ्याची शिखर समितीची बैठक असो अथवा विधानमंडळाचे कामकाज यासाठी विमान प्रवासाचा वापर करण्यात आला आहे. तसेच स्मार्ट सिटीसंदर्भात दिल्ली आणि हैदराबाद याठिकाणी झालेल्या बैठका, कार्यशाळांनाही हवाई मार्गाने जात उपस्थिती लावलेली आहे. या विमानवाऱ्यांवर १ लाख ११ हजार रुपये खर्ची पडले आहेत. विमान प्रवासाबरोबरच गेडाम यांनी मनपाच्या वाहनातून ३६ हजार ७६३ कि.मी. प्रवास केला आहे. त्यासाठी ३४१८ लिटर इंधनावर महापालिकेचा खर्च झालेला आहे. गेडाम हे नाशिकला कमी आणि जळगाव, धुळे, सोलापूर या ठिकाणीच जास्त जात असल्याची टीका स्थायी समिती व महासभांतून सदस्यांनी वेळोवेळी केली होती. माहितीच्या अधिकारान्वये गेडाम यांच्याप्रमाणेच आजवर राहिलेल्या आयुक्तांचाही वाहन खर्च समोर आला आहे. त्यात बी. डी. सानप यांनी आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत ६४ हजार २८५ कि.मी. प्रवास केल्याचे तर त्यावर ७२२० लिटर्स इंधन वापरल्याचीही माहिती उघड झाली आहे. म्हणजे सानप हे प्रतिदिन सुमारे ६० ते ६५ कि.मी. वाहनातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास येते. त्याखालोखाल विलास ठाकूर यांनी ५१ हजार ९५० कि.मी. प्रवास केला असून ६१८९ लिटर्स इंधनाचा वापर झालेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: GEDAM flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.