गीते, बागुल यांच्या सेनाप्रवेशामुळे भाजपला धक्क्यांवर धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:11 AM2021-01-09T04:11:51+5:302021-01-09T04:11:51+5:30
नाशिक : माजी आमदार आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते, तसेच सुनील बागुल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाला मोठा ...
नाशिक : माजी आमदार आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते, तसेच सुनील बागुल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतरच माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनीही खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने आता भाजपातील गळती सुरू झाली आहे. अर्थात, भाजपलाही काही नगरसेवक जाणे अपेक्षीत असले, तरी दोन प्रमुख नेत्यांमुळे मात्र पक्षाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर या पक्षात मेाठ्या प्रमाणात इनकमींग झाले होते. मात्र, राज्यातील सत्तानंतर आता अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांचे आउटगेाइंग सुरू हेाणार, अशी चर्चा गेल्या वर्षापासूनच सुरू झाली होती. त्याला आता सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.८) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गीते आणि बागुल यांच्या जाण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्या पाठाेपाठ माजी सभागृहनेता दिनकर पाटील हेही राऊत यांना भेटून आले. आपल्या संस्थेच्या शाळेच्या उद्घाटनासाठी भेटून आल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी विधानसभा आणि महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने पाटील नाराज असून, त्यामुळेच ते शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
वसंत गीते हे गेल्या काही वर्षांपासून भाजपत अस्वस्थ होते. शिवसेनेचे पहिले महापौर आणि नंतर मनसेचे पहिले आमदार अशी दोन्ही पदे त्यांनी भूषवल्यानंतर ते भाजपत दाखल झाले होते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांच्या पुत्र प्रथमेश गीते यांना नगरसेवक झाल्यांनतर लगेचच उपमहापौरपद दिल्याने भाजपात नवे जुने असा वाद उफाळला होता. वसंत गीते यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले होते. भाजपने त्यांच्या आठ ते दहा समर्थक नगरसेवकांनाही उमेदवारी दिली आणि बहुतांश उमेदवार निवडून आले आहेत. सुनील बागुल हेही आधी शिवसेनेत जिल्हाप्रमुख होते, नंतर ते राष्ट्रवादीत गेले तेथून भाजपत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर दिनकर पाटील यांच्यासह अन्य अनेक आजी माजी नगरसेवक आता शिवसेनेच्या संपर्कात हेाते. त्यामुळे २०१७च्या आधी ज्याप्रमाणे मनसेच्या चाळीस नगरसेवकांपैकी शेवटी आठ ते दहा नगरसेवक शिल्लक राहिले, तसे धक्के बसण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
इन्फो...
आजी माजी उपमहापौरांचे आप्तेष्ट
प्रथमेश गीते हे माजी तर भिकूबाई बागुल या विद्यमान उपमहापौर आहेत. त्यामुळे भाजपाला धक्का बसणार आहे. या शिवाय गीते-बागुल यांचे समर्थकही अनेक नगरसेवक आहेत. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्या, तरी आता स्थायी समितीची निवडणूक महत्त्वाची असून, त्यात समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.