दीड लाख दुबार नावांवर गंडांतर
By admin | Published: December 16, 2014 01:52 AM2014-12-16T01:52:21+5:302014-12-16T01:52:53+5:30
निवडणूक आयोग : मतदार यादी अद्यावत
नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव सापडत नसल्याच्या कारणावरून नव्याने नोंदणी करून यादीत दुबार नावांची भर घालणाऱ्या जिल्'ातील सुमारे दीड लाखांहून अधिक मतदारांच्या नावांवर गंडातर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या दुबार नावांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानेच तपासणी करून तशा नोटिसा तयार केल्या आहेत. गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची प्रत्यक्ष केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जावून खातरजमा केली असता, अनेक मतदार पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांची नावे कमी करण्यात आली होती. जिल्'ातील पंधराही विधानसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतदारांची दुबार, मयत व स्थलांतरीत मतदार म्हणून नोंद झाल्याने अशा मतदारांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करून त्यांना त्यांचे नाव मतदार यादीत ठेवणे अगर वगळणे याबाबत अवगत करण्यात आले. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही सारी नावे वगळण्यात आली. मात्र एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांची नावे सापडत नसल्याने मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्याने थेट न्यायालयानेच आदेश देऊन निवडणूक आयोगाला मतदार नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येऊन ज्यांची नावे मतदार यादीत सापडली नाहीत व ज्यांची नावे वगळण्यात आली अशांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली.