मालेगावी कोरोना उपाययोजनांसाठी ६.७२ कोटींच्या खर्चाला महासभेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:43+5:302021-03-23T04:15:43+5:30

मालेगाव : शहरात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजनांसाठी महापालिकेला १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधी ...

General Assembly approves Rs 6.72 crore for Malegaon Corona measures | मालेगावी कोरोना उपाययोजनांसाठी ६.७२ कोटींच्या खर्चाला महासभेची मंजुरी

मालेगावी कोरोना उपाययोजनांसाठी ६.७२ कोटींच्या खर्चाला महासभेची मंजुरी

Next

मालेगाव : शहरात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजनांसाठी महापालिकेला १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधी वरील व्याजाचे ६ कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. तसेच सहारा रुग्णालयातील रुग्णांची होणारी हेळसांड, गैरसोय, रेमेडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले. संगमेश्‍वरातील नियोजित उद्यानाच्या नामकरणावरून महासभेत दीर्घकाळ चर्चा झाली.

मालेगाव महापालिकेची ऑनलाईन महासभा सोमवारी महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर निलेश आहेर , उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव शाम बुरकुल यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेच्या प्रारंभी विषयपत्रिकेवरील मनपा मालकीच्या आठ वर्गखोल्या भाडेतत्त्वावर देण्याचा विषय, सायने बु. क्रमांक १ मध्ये उपलब्ध असलेल्या जागेवर शहरी बेघरांसाठी निवारागृह उभारण्यासाठी जागा देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. या विषयावर डॉ. खालीद परवेझ यांनी शहरात किती लाभार्थी आहेत? सर्वेक्षण झाले आहेत? का? असा सवाल उपस्थित केला. यावेळी कन्नोर यांनी सर्वेक्षण झाले असून १०२ निवारा नसलेले लाभार्थी आढळून आले असल्याचे सांगितले तर आरबीएच शाळेजवळील उद्यानाजवळ दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेला कार्यालयासाठी जागा देण्याच्या विषयावर चर्चा होऊन संबंधित संस्थेला इतरत्र जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेच्या ठिकाणी दर्गासाठी आरक्षित जागेवर ताजिया घर बनविण्याससह टेहरे फाट्यावर गिरणानदी पत्रात गणेश कुंड , ताजियाकुंडच्या कामांना महासभेने मंजुरी दिली. यावेळी शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी गणेश कुंड व ताजिया कुंडाचे काम जागेअभावी प्रलंबित असल्याचे सभागृहात सांगितले. या विषयानंतर नगरसेवक सखाराम घोडके यांनी मांडलेला संगमेश्वरातील नियोजित उद्यानाच्या नामकरणाचा विषय चर्चेला आला. या विषयाला नगरसेवक सुनील गायकवाड, नगरसेविका दीपाली वारुळे यांनी आक्षेप घेत यापूर्वीच उद्यानाला महापुरुषाचे नाव दिले गेले आहे. नावात बदल करू नका असे सांगितले. राजकीय दबाव वापरून नावात बदल केला जात असल्याचा आरोपही नगरसेविका वारुळे यांनी केला. यानंतर विविध चौकांच्या नामकरणाचा विषय मंजूर करण्यात आला आहे. तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या निधी वरील व्याजाची रक्कम उपाययोजनांसाठी खर्च करण्यास महासभेने मान्यता द्यावी असा विषय प्रशासनाने महासभेपुढे मांडला. यावरून डाॅ. खालीद परवेझ यांनी महापालिका क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहेत. मात्र, यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. बाहेरचे किती रुग्ण आहेत? असा सवाल उपस्थित केला. यावेळी उपायुक्त कापडणीस यांनी ग्रामीणचे पाच किंवा सहा रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरी भागातील रुग्णही ग्रामीण भागातील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले.

-------------------------

रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे उघड

नगरसेवक सुनील गायकवाड यांनी महापालिकेच्या सहारा रुग्णालयात रेमडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब सभागृहात मांडली. यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगितले. यावर उपायुक्त कापडणीस यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले. यावेळी नगरसेवक मदन गायकवाड यांनी महापालिकेकडून रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना सुविधा पुरविल्या जात नाहीत असे सांगितले. यावर आयुक्त कापडणीस यांनी रुग्णांची हेळसांड होणार नाही. महापालिका काळजी घेत आहे, असे सांगितले महासभेच्या चर्चेत मुस्‍तकीम डिग्निटी, उपमहापौर आहेर रशीद शेख अतिक्रमान आदींसह नगरसेवकांनी सहभाग घेतला.

Web Title: General Assembly approves Rs 6.72 crore for Malegaon Corona measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.