मालेगावचे सामान्य रुग्णालय आता नॉन कोविड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:19 PM2020-04-21T22:19:13+5:302020-04-21T22:19:30+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध सूचना
मालेगाव : मालेगाव शहराला कोरोनामुक्तकरण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिका-याने त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा, भविष्यातील धोके ओळखून सोपविलेल्या जबाबदारीचे काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. दरम्यान, मालेगावचे सामान्य रुग्णालय आता नॉन कोविड रुग्णालय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल डिस्टन्सिंगचे अनुपालन होण्याच्या उद्देशाने मालेगाव येथील विश्रामगृहाच्या आवारातील मोकळ्या जागेत उपस्थित सर्व विभागप्रमुखांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, सामान्य रुग्णालय हे आता यापुढे नॉन कोविड रुग्णालय असणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लगतच्या पाचही तालुक्यांमधील शासकीय वाहनांसह कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ अधिग्रहित करण्यात यावी. रुग्ण दाखल होण्यापूर्वीच त्याचे सिडीआरसह कॉन्टॅक्ट ट्रेसिंंग अपेक्षित आहे. महानगरपालिकेमार्फत गठित करण्यात आलेल्या समितीला सर्वतोपरी सहकार्य मिळेल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पाचही तालुक्यातील कर्मचाºयांच्या टीम तयार करून मालेगाव तालुक्यातील सर्व चेकपोस्टवर नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येणाºया रमजान पर्वाच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांसाठी आवश्यक सोयीसुविधांबाबतही सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य कर्मचाºयांची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या.