सर्वसामान्य गृहिणी ते जिल्हा परिषद अध्यक्ष
By Admin | Published: March 22, 2017 12:30 AM2017-03-22T00:30:39+5:302017-03-22T00:30:53+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून केवळ सभापतिपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला शीतल उदय सांगळे यांच्या रूपाने प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले आहे.
उदयोन्मुख नेतृत्व : सिन्नर तालुक्याला प्रथमच मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद
शैलेश कर्पे : सिन्नर
जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून केवळ सभापतिपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला शीतल उदय सांगळे यांच्या रूपाने प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले आहे. राज्यमंत्रिपदाचा दर्जा मानल्या जाणाऱ्या व मिनी मंत्रालयाचा लाल दिवा जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सिन्नरला लाभला आहे. सर्वसामान्य गृहिणी ते जिल्हा परिषद अध्यक्ष अशी सांगळे यांची राजकारणातील उदयोन्मुख प्रगल्भता यानिमित्ताने अधोरेखित होते. सिन्नरच्या समाजकारणात, राजकारणात व धार्मिकक्षेत्रात सांगळे कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय मानला जातो. सिन्नरच्या राजकारणात नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सांगळे कुटुंबातील महिला राजकारणात प्रवेश करेल की नाही, याबाबत जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी बऱ्याच चर्चा झडल्या. मात्र राजकारणात सुशिक्षित महिलेने सक्रिय व्हावे, अशी भूमिका सांगळे कुटुंबाचे आधारस्तंभ व उद्योजक पुंजाभाऊ सांगळे यांनीच मांडल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सुसंस्कृत, शालीन, उच्चशिक्षित आणि विनयशील गृहिणी असलेल्या शीतल सांगळे यांचे नाव निवडणुकीसाठी आघाडीवर आले. योगायोगाने जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलेसाठी राखीव असल्याने अध्यक्षपद मिळविण्याच्या उद्देशानेच रणनीती ठरविण्यात आली.
केवळ गृहिणी अशी ओळख असलेल्या शीतल सांगळे यांना चास गटातून उमेदवारीसाठी मोठा आग्रह झाला. मात्र शीतल सांगळे यांना राजकारणातील फारसा अनुभव नव्हता. उदय सांगळे यांनी चास गणातून पंचायत समितीची निवडणूक लढविली तेव्हा आणि विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्तीताई वाजे यांच्यासोबत शीतल सांगळे प्रचाराला बाहेर पडल्या होत्या. एवढाच काय तो शीतल सांगळे यांचा राजकारणातील अनुभव होता. मात्र जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची म्हटल्यावर शीतल सांगळे या काहीशा गोंधळून गेल्या होत्या. मात्र निवडणूक लढावायची ठरल्यानंतर ती जिंकण्याच्या उद्देशानेच त्या मैदानात उतरल्या आणि लाल दिवा सिन्नरच्या आणण्याचा इतिहास रचला. शीतल सांगळे यांचे माहेर संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील. ते शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीबरोबरच त्यांना शिक्षणाची ओढ होती. वडील हरिभाऊ आंधळे आणि आई मथुराबाई यांनी मुलीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. लोणी येथील प्रवरा शिक्षण संस्थेत बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संगमनेर येथील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत बी.फार्मसीसाठी प्रवेश घेऊन पदवी घेतली. औषधशास्त्रातील पदवीधर झाल्यानंतर सिन्नरच्या राजकारण, समाजकारण आणि उद्योगक्षेत्रात अग्रेसर असलेल्या उदय सांगळे यांच्या सोबत २००९मध्ये विवाह झाला. उदय सांगळे यांची जीवनसाथी झाल्यानंतर त्या क्षेत्रातील शास्त्रही त्यांनी लवकर अवगत केले. सासरे पुंजाभाऊ, भाया, (मोठे दीर) भाऊसाहेब यांचा रस्ते बांधणी उद्योगाचा मोठा पसारा असल्याने व पती उदय सांगळे राजकारणात सक्रिय असल्याने शीतल सांगळे यांच्यावर गृहिणी म्हणून जबाबदारी पडली. सांगळे कुटुंबीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने घरी सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता होता. त्यांचे स्वागत आदरातिथ्य करताना घरातील महिलावर्गाची तारांबळ उडायची.
जिल्हा परिषदेच्या चास गटाचे आरक्षण महिलेसाठी राखीव झाल्याने शीतल सांगळे यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाली. राजकारणाचा फारसा अनुभव नसतानाही शीतल सांगळे या गृहिणीने मनाची तयारी केली. घरातील सर्वजण पाठीशी ठामपणे उभे राहिले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली. अध्यक्षपद महिलेसाठी राखीव असल्याने सुरुवातीपासूनच शीतल सांगळे यांचे नाव आघाडीवर राहिले. समाजसेवेचा वसा सांगळे घराण्यात सुरुवातीपासून आहे. तो अधिक चांगल्या रितीने पुढे नेण्यासाठी शीतल सांगळे यांना अध्यक्षपद मिळाल्याने मोठी संधी चालून आली आहे.
सांगळे कुटुंबीय राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने घरी सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता असतो. त्याची शीतल सांगळे यांना सवय आहे. उदय सांगळे यांचा दिवस मोठ्या गर्दीने सुरू होतो. सकाळी लवकर उठून रोज कुठल्यातरी कार्यक्रमाला जाण्यासाठी ते तयार असतात. मुलगी अनुष्काच्या शाळेची तयारी व जेवणाचा डबा आणि एकूणच घरातील सर्व कामांचे मातृरूपाची अनुभूती देणाऱ्या सासूबाई कलावती सांगळे व मोठ्या जाऊबाई शुभांगी सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात शीतल सांगळे नेहमी व्यस्त राहतात.