त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची सर्वसाधारण सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:19 PM2021-01-27T23:19:09+5:302021-01-28T00:43:07+5:30
त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या मागील अनेक सभांमध्ये सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने बुधवारी (दि.२७) आयोजित ...
त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या मागील अनेक सभांमध्ये सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने बुधवारी (दि.२७) आयोजित केलेली सर्वसाधारण सभा सभापतींनी तहकूब केली.
सभापती मोतीराम दिवे व उपसभापती देवराम मौले यांच्या उपस्थितीत सभा आयोजित केली होती. यावेळी खरशेत, मुलवड व देवळा या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत केलेल्या रस्त्याच्या व इतर विकासकामांचे ई-टेंडरिंग, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी आदी कार्यालयीन सोपस्कार पार न पाडता थेट काम करून मोकळे झाले. याबाबतीत अनियमितता झाल्यामुळे सदस्यांनी चौकशीची मागणी केली. तसेच शिरसगाव येथील ४१ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियाच्या अनियमिततेबाबतचा चौकशी अहवाल अद्याप सदस्यांपुढे सादर झालेला नाही. संबंधितांवर काय कारवाई केली, याबाबत सदस्यांनी विचारणा केली. ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी व स्वतः बीडीओ, एबीडीओ यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. तसा जीआरदेखील आहे. त्याबाबतही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दरम्यान, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने सभापतींनी सभा तहकूब केली.
घरभाडे बंद होणार?
गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी मुख्यालयी जे लोक राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे अनेकांचे घरभाडे बुडणार आहे. सदस्यांनी मुख्यालयी अधिकारी राहत नसल्याची तक्रार केली होती.