येवला पंचायत समितीची सर्वसाधारण सभा
By admin | Published: November 4, 2015 11:32 PM2015-11-04T23:32:59+5:302015-11-04T23:33:29+5:30
येवला पंचायत समितीची सर्वसाधारण सभा
येवला : येथील पंचायत समितीची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी
१ वाजता संपन्न झाली. यावेळी सभापती प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन मंडळ, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना इत्यादि विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. एकात्मिक बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी कार्यकर्ता यांच्या पदभरतीसाठी येत्या दोन दिवसांत जाहिरात देण्यात येणार असून, जाहिरातीच्या दिनांकापासून १० दिवसांत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावेळी दिली, तर शिक्षण विभागातर्फे कामकाजाचा आढावा देताना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एरंडगाव येथील माध्यमिक हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कृषी संजीवनी व नवसंजीवनी योजना यांना मुदतवाढ देण्यात आली असून, मार्च २०१४ पर्यंतच्या थकीत बिलावर ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता यांनी दिली. यावेळी उपसभापती जयश्री बावचे, हरिभाऊ जगताप, दिलीप मेंगळ, पोपट आव्हाड, रतन बोरनारे, शिवांगी पवार, शकुंतला कोंढरे, राधाबाई कळमकर, भारती सोनवणे आदि उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सभापती, उपसभापती व पंचायत समिती सदस्य यांनी प्रत्येकी १ हजार रु पये निधी संकलित करून १० कुपोषित बालकांना प्रथिनजन्य कोरडा आहार देण्यात आला. (वार्ताहर)