जुने नाशिक, वडाळ्याला जनरल फिजिशियन देणार ‘राहत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 07:15 PM2020-06-21T19:15:26+5:302020-06-21T19:32:26+5:30
जनरल फिजिशियन मैदानात, सरकारी रुग्णालयांचा बाह्यरुग्ण तपासणीचा ताण होणार कमी
नाशिक : कोरोना कालावधीत डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह जिल्हा शासकिय रूग्णालयावर बाह्यरूग्ण तपासणीचा वाढता ताण लक्षात घेता राहत फाऊण्डेशनकडून जुने नाशिक, वडाळा भागात दैनंदिन सराव करणाऱ्या मुस्लीम जनरल फिजिशियन डॉक्टर वर्गाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत पुर्ण क्षमतेने नॉन कोविड वैद्यकिय सेवा पुरविण्याचा निर्धार डॉक्टरांनी व्यक्त केल्याने या भागातील नॉन कोविड रूग्णांची हेळसांड थांबून त्यांना ‘राहत’ मिळण्यास मदत होणार आहे.
जुने नाशिक, वडाळागाव, वडाळारोड, पखालरोड हा भाग मुस्लीमबहुल म्हणून ओळखला जातो. गावठाण व दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. जुने नाशिक परिसरातील नागरिकांनी आपआपला व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद करत मनपाच्या ‘कन्टेंन्मेंट झोन’निर्मितीसाठी पुर्ण सहकार्य केले आहे. या भागात कोरोनाव्यतिरिक्तदेखील अन्य शारिरिक तक्रारींचे रूग्ण अधिक आहेत. यामुळे झाकीर हुसेन रुग्णालयावर ताण वाढत होता. सध्या झाकीर हुसेन रु ग्णालय कोविड-१९ रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे या रुग्णालयात बाह्यरूग्ण तपासणीवर परिणाम झाला असून रुग्णालयात अन्य आजारांच्या तक्रारी असलेले रुग्णदेखील जाण्यास धजावत नसल्याने समोर आले आहे.
वडाळारोडवरील बगई लॉन्स येथे राहत फाउंडेशनकडून घेण्यात आलेल्या बैठकीत जुने नाशिक भागातील ५०हून अधिक डॉक्टर उपस्थित होते. सामाजिक अंतरसह अन्य सर्व नियमांचे पालन करत बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डॉक्टर रफिक शेख होते. व्यासपीठावर महापालिकेचे करोना सेलचे प्रमुख डॉ.आवेश पलोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, फाउण्डेशनचे अध्यक्ष अॅड. नाझीम काझी, आसिफ शेख आदि उपस्थित होते.
करोनाची लक्षणे नसलेल्या परंतु अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या रु ग्णांचा ओघदेखील दुसरीकडे वाढू लागला आहे. मर्यादित डॉक्टर्स, तोकडे मनुष्यबळामुळे महापालिका व जिल्हा शासकीय रु ग्णालयाच्या वैद्यकीय यंत्रणेवर ताण निर्माण होत असल्याची खंत या बैठकीत पलोड यांनी व्यक्त केली. शहरातील डॉकटराकडे मदत मागूनही प्रतिसाद मिळत नसल्याबाबत ही त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत प्रातिनिधिक स्वरुपात जनरल फिजिशियनकडून काही सुचना मांडण्यात आल्या.