अकरावीसाठी २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:35 AM2018-06-24T00:35:07+5:302018-06-24T00:35:36+5:30
दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
नाशिक : दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रिया वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रक्रि या पूर्ण केल्या नाहीत त्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरून त्याची पडताळणी झाल्यानंतर भाग-२ भरावा लागणार आहे. भाग-२ साठी कोणतीही पडताळणी करावी लागणार नाही.
या प्रवेशप्रक्रियेत १३ ते २९ जून या कालावधीत बायोफोकल, इनहाउस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश करण्यात येणार आहे. दरम्यान, १३ ते १८ जून (६ दिवस) द्विलक्षी बायोफोकल विषयांचे पसंतीक्रम भरणे व कोटा प्रवेशांतर्गत इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी महाविद्यालय स्तरावर विविध विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारणे, कोटा प्रवेशाची गुणवत्ता यादी महाविद्यालय स्तरावरून जाहीर करणे व झालेले कोटा प्रवेश महाविद्यालयाकडून केंद्रीय प्रवेश प्रणाली अद्ययावत करणे ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, २९ जूनपर्यंत बायोफोकल प्रवेशप्रक्रियाही पूर्ण होणार असून, याच दिवशी नियमित अकरावी प्रवेशासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, बायोफोकोलच्या २५ टक्के राखीव जागांसाठी आतापर्यंत प्रवेश जाहीर झाले असून, दुसºया फेरीत शुक्रवारपर्यंत (दि. २९) प्रवेश घेता येणार आहे.
२३ हजार विद्यार्थ्यांनी भरले दोन्ही भाग
अकरावी प्रवेशासाठी नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे २७ हजार ९०० उपलब्ध जागांसाठी २७ हजार ५८३ आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचा भाग दोन भरून अर्ज सबमिट केला आहे. यात २७३ विद्यार्थ्यांनी बायोफोकलच्या २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी उपलब्ध पर्याय निवडला असून, २२ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी विविध शाखा व महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदवून त्यांचे आॅनलाइन अर्ज सादर केले आहेत.