सर्वसाधारण गणावर नेत्यांची मदार!
By Admin | Published: February 9, 2017 11:14 PM2017-02-09T23:14:18+5:302017-02-09T23:14:33+5:30
चुरशीची लढत : इंधन कंपन्यांमुळे आली सुबत्ता
गिरीश जोशी मनमाड
तालुक्यातील भालूर गटातील पानेवाडी गण सर्वसाधारण झाल्याने हिरमोड झालेल्या गटातील नेतेमंडळींची मदार पानेवाडी गणावर असल्याचे दिसून येते आहे. इंधन कंपन्यांमुळे सुबत्ता आलेल्या तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींचा समावेश या गणात असल्याने पानेवाडीवर वर्चस्व राखण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
इंधन कंपन्यांमुळे नावारूपास आलेला पानेवाडी हा गण सर्वसाधारण आहे. या गणात १७ हजार १३९ मतदार असून, गणामध्ये पिंप्राळे, वाखारी,
नांदूर, पारेकरवाडी, कोंढार, दऱ्हेल, बोयेगाव, भार्डी, धनेर, नवसारी, खादगाव, अस्तगाव, पांझणदेव, धोटाणे खुर्द, धोटाणे बुद्रुक, पानेवाडी, हिरेनगर या गावांचा समावेश होतो. २०१२च्या निवडणुकीचा अपवाद वगळता अनेक वर्षांपासून या गणावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. पानेवाडी गणाने नांदगाव पंचायत समितीला बाबूराव हाके, रतन लहिरे व सुरक्षा केसकर हे तीन सभापती दिले आहेत.
१९७५ साली आजच्या पानेवाडी गणातील के. टी. खरे यांनी या गणाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी मनमाड शहरातील जुना नागापूर रोड, गर्डर शॉप, बुरकुल वाडीचा काही भाग जि. प. हद्दीत होता. त्यामुळे मनमाड येथील रहिवाशाने पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. त्यानंतर १९७९ साली बाबूराव हाके यांच्या रूपाने आजच्या पानेवाडी गणातील सदस्याला प्रथमच नांदगाव पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीचे सभापती होता येत होते. १९८० रोजी झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल बारा वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही. या काळात बाबूराव हाके यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले होते. नाशिक जि. प. च्या बांधकाम समिती सभापतिपदाची जबाबदारी हाके यांनी सांभाळली होती.
त्यानंतर शिवसेनेचे दशरथ लहिरे (२००२), बाळासाहेब आव्हाड (२००७), राष्ट्रवादीच्या सुरक्षा केसकर (२०१२) या सदस्यांनी पानेवाडी गणाचे प्रतिनिधित्व केले. २००७ साली जामदरी गटाचे नाव बदलून भालूर गट असे करण्यात आले. यामध्ये भालूर व पानेवाडी या दोन गणांचा समावेश आहे.
पानेवाडी गण सर्वसाधारण आहे. सुरुवातीच्या काळात अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते; मात्र भालूर गट व गणातील आरक्षणामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहावयास मिळाला.
पानेवाडी गट सर्वसाधारण असल्याने सर्व नेत्यांची मदार या गणावर आहे. गेल्या काही वर्षांपासून पानेवाडी गण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीच्या वेळी तालुक्यात भुजबळ यांचे वर्चस्व होते. भालूर गटात व गणात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असले तरी पानेवाडी गणात मात्र राष्ट्रवादीच्या सुरक्षा केसकर यांनी शिवसेनेच्या विमलबाई आव्हाड यांचा पराभव करून विजय संपादन केला होता.
शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्षांनी
स्थानिक पातळीवर आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन खलबते सुरू केली आहेत.