टोमॅटो घ्या टोमॅटोऽऽ.. फुकट घ्या फुकट..! नाराज शेतकऱ्यांनी लोकांना वाटले टोमॅटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 06:26 AM2023-09-21T06:26:53+5:302023-09-21T06:27:31+5:30
हिवरगाव-वडांगळी रस्त्यावर हिवरगाव (घंगाळवाडी) येथील अरुण शेलार, रमेश सहाणे, सोमनाथ सहाणे व पिंटू शेलार या शेतकऱ्यांनी सुमारे १५० नागरिकांना मोफत टोमॅटो वाटले
सिन्नर (जि. नाशिक) : टोमॅटो घ्या टोमॅटोऽऽ.. फुकट घ्या फुकटऽऽ.. इकडे टोमॅटो लावले चकटफूऽऽ.. अशा बेंबीच्या देठापासून आरोळ्या ठोकत सिन्नर तालुक्यातील हिवरगाव (घंगाळवाडी) येथील शेतकऱ्यांनी वाटसरूंना व झोपडपट्टीतील गरजूंना फुकट टोमॅटो वाटून बळीराजाच्या दु:खाकडे लक्ष वेधून घेतले.
हिवरगाव-वडांगळी रस्त्यावर हिवरगाव (घंगाळवाडी) येथील अरुण शेलार, रमेश सहाणे, सोमनाथ सहाणे व पिंटू शेलार या शेतकऱ्यांनी सुमारे १५० नागरिकांना मोफत टोमॅटो वाटले. बाजारभाव नसल्याने शासनाने लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला. काही दिवसांपूर्वी टोमॅटोने लाखोंचा नफा मिळवून दिला. त्याचा राज्यभर गवगवा झाला. मात्र आता हजारो शेतकऱ्यांच्या टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असताना त्याचा कोणालाही कळवळा येत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
देशात कमीत कमी ९ रुपये भाव
टोमॅटोच्या भावात संपूर्ण देशभरात घसरण झाली असून ग्राहक व्यवहार विभागाच्या माहितीनुसार, देशात टोमॅटोचा कमीत कमी प्रतिकिलो भाव हा अवघा ९ रुपये एवढा आहे. सरासरी भाव ३६ तर जास्तीत जास्त १२० रुपये प्रतिकिलो आहे.