स्वर ओंकाराने सजली पाडवा पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:46 AM2019-10-31T00:46:17+5:302019-10-31T00:46:34+5:30
अहिर भैरव रागापासून प्रारंभ झाल्यानंतर देसकार अन् हिंदोल रागांचे बहारदार सादरीकरण करीत प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांनी पाडवा पहाट मैफलीत रंग भरले. उत्तरार्धात भजन, अभंग आणि नाट्यगीतांनी पिंपळपारावरील मैफल खुलत गेल्याने गोडगुलाबी थंडीत रसिकांना वेगळ्याच आनंदाची अनुभूती दिली.
नाशिक : अहिर भैरव रागापासून प्रारंभ झाल्यानंतर देसकार अन् हिंदोल रागांचे बहारदार सादरीकरण करीत प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांनी पाडवा पहाट मैफलीत रंग भरले. उत्तरार्धात भजन, अभंग आणि नाट्यगीतांनी पिंपळपारावरील मैफल खुलत गेल्याने गोडगुलाबी थंडीत रसिकांना वेगळ्याच आनंदाची अनुभूती दिली.
नेहरू चौकातील पिंपळपारावर संस्कृती नाशिक पाडवा पहाटची मैफल प्रख्यात गायक ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय स्वरांनी न्हाऊन निघाली. ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आमदार हेमंत टकले, अॅड. विलास लोणारी, डॉ. अनिरु द्ध धर्माधिकारी, सुरेश भटेवरा, गुरु मित बग्गा, अॅड. जयंत जायभावे, उद्योगपती श्रीरंग सारडा, श्रीपाद कुलकर्णी, विनोद शहा, कर्नल इंगोले, माजी महापौर अशोक मुर्तडक, शिवाजी गांगुर्डे, डॉ. नारायण विंचूरकर, बाळासाहेब गामणे, रवींद्र कदम, अॅड. अशोक जाधव, गुलाम शेख व धनपाल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने मैफलीचा शुभारंभ झाला.
ओंकार यांनी अहिर भैरव रागाने मैफलीचा प्रारंभ केला. विलंबित ख्याल एकताल बंदिशींचे बोल होते गोकुल के अहिर... त्यानंतर द्रुत तीनतालाचे बोल दरस भये व द्रुत एकतालात बेग बेग आवो मंदिर ही बंदिश सादर केली. त्यानंतर देसकार रागातील मध्यलयीतील तीनतालात झानजरिया झनके हा तराणा पेश केला. मीराबार्इंचे जोगिया रागातील मेरो मन राम राम रटे हे अवीट भजन सादर केले. उत्तरार्धात राग हिंदोलमधील कोयलिया बोले ही मध्य लयीतील बंदिश, काळ देहासी आला खाऊ हा नामदेव महाराजांचा अभंग, नारायणा रमा रमणा व राम रंगी रंगले ही नाट्यगीते व अखेरीस शिव के मन शरण हो हा भैरवीमधील अभंग गाऊन मैफलीची सांगता केली.
विलास शिंदे यांचा गौरव
मध्यंतरादरम्यान सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे प्रवर्तक विलास शिंदे यांचा शाहू खैरे यांच्या हस्ते संस्कृती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संस्कृती सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असते. त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही शाहू खैरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन आमदार हेमंत टकले यांनी केले. नाशिकच्या शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाला शेवटपर्यंत जागणार असल्याची ग्वाही विलास शिंदे यांनी दिली.