अभ्यासक्रम विकासाचे स्वातंत्र्य मिळावे
By admin | Published: January 24, 2017 11:35 PM2017-01-24T23:35:55+5:302017-01-24T23:36:15+5:30
पठाण : मविप्रच्या विविध माहााविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे पदवीग्रहण
नाशिक : बदलत्या परिस्थितीनुसार आधुनिक जगाला आवश्यक असलेली गुणवत्ता भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आहे. परंतु, परंपरागत पद्धतीने चालत आलेली शैक्षणिक पद्धती आणि अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षित प्रगतीला वाव मिळत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना परदेशातील स्वायत्त महाविद्यालये तथा विद्यापीठांप्रमाणे भारतातही महाविद्यालयांना विविध क्षेत्रांत संशोधनात्मक व विकासात्मक प्रगती साधणारा अभ्यासक्रम विकसित करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी केले. केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुशास्त्र, विधी व अॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त पदवीग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या समवेत सभापती अॅड. नितीन ठाकरे, प्रा. बी. एन. शिंदे, डॉ. के. एस. होळकर, डॉ. पी. एस. बस्ते, डॉ. एस. टी. गडाख आदि उपस्थित होते. पठाण म्हणाले, पाऊस, वने, जमीन ही ज्याप्रमाणे राष्ट्राची संपत्ती आहे, त्याचप्रमाणे ज्ञानसंपन्न युवा पिढीही राष्ट्राची संपत्ती आहे.
या ज्ञानसंपत्तीच्या जोरावर भारत भविष्यात संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. त्यासाठी येथील शैक्षणिक पद्धतीत काळानुरूप बदल होण्याची गरज व्यक्त करतानाच त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे पठाण यांनी आवाहन केले. तर नीलिमा पवार यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्रगत तथा उज्ज्वल भारताचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती गटणे यांनी, तर प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते आभार मानले. (प्रतिनिधी)