सर्व्हर डाउनमुळे हॉल तिकीट मिळेना
By admin | Published: April 24, 2017 02:12 AM2017-04-24T02:12:03+5:302017-04-24T02:12:11+5:30
शनिवारी नीटच्या संकेतस्थळावर हॉल तिकीट जाहीर करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळू शकलेले नाही.
नाशिक : वैद्यकीय आणि दंतवैद्यक शाखेच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता अर्थात नीटची परीक्षा देण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या शहरातील विद्यार्थ्यांना अद्यापही हॉल तिकीट मिळेनासे झाले आहे. शनिवारी नीटच्या संकेतस्थळावर हॉल तिकीट जाहीर करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळू शकलेले नाही.
यंदा महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह १०३ शहरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. नीट परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना गेल्या १५ एप्रिल रोजीच हॉल तिकीट दिले जाणार होते. परंतु काही कारणास्तव त्यास विलंब झाल्याने आणि शनिवारी (दि. २२) विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावर्षी या परीक्षेसाठी सुमारे ११.३५ लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असून, ही संख्या मागीलवर्षीच्या तुलनेत सुमारे ४१ टक्के अधिक आहे. मागीलवर्षी सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. यावेळी नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, सातारा या चार ठिकाणी परीक्षा होणार आहे. २३ शहरांतील १०३ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा होणार आहे.
नीटच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र प्राप्त होणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक जवळ ठेवावा लागणार आहे.
परीक्षेसाठी सदर प्रवेशपत्र अत्यंत महत्त्वाचे असून, परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र घेऊन जाणे अनिवार्य आहे. यासाठी लागणारे छायाचित्रदेखील विद्यार्थ्याला जवळ ठेवावे लागणार आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना हॉल तिकीटावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान रविवारीदेखील हॉल तिकीट उपलब्ध होऊ शकली नाहीत. (प्रतिनिधी)