भुयारी गटार टप्पा दोनचे प्रलंबित अनुदान मिळणार
By admin | Published: June 22, 2017 12:30 AM2017-06-22T00:30:20+5:302017-06-22T00:30:36+5:30
नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत महापालिकेने साकारलेल्या भुयारी गटार योजना टप्पा दोनचे प्रलंबित अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत महापालिकेने साकारलेल्या भुयारी गटार योजना टप्पा दोनचे प्रलंबित अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली असून, केंद्र सरकारच्या हिश्श्यापोटी देय निधीपैकी ८० टक्के रक्कम महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेने टप्पा दोन अंतर्गत आगर टाकळी व पंचक येथील मलनिस्सारण केंद्राचे काम ३१ डिसेंबर २०१६ पूर्वीच पूर्ण केलेले आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या पायाभूत सुविधांविषयक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. सदर अभियान मार्च २०१४ मध्येच संपुष्टात आले. मूळ अभियानातील ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रगती असणाऱ्या प्रकल्पांना पुढील निधी वितरित झाला नाही. नाशिक महापालिकेने भुयारी गटार योजना टप्पा एक आणि दोन जेएनएनयूआरएम अंतर्गत पूर्णत्वाला नेल्या. मात्र, टप्पा दोनअंतर्गत तिसरा आणि चौथा हप्ता मिळू शकला नव्हता. सदर हप्ता मिळावा यासाठी महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला होता. टप्पा दोनमधील पंचक आणि आगर टाकळी मलनिस्सारण केंद्राचे काम बाकी होते. मात्र, राज्य सरकारने सदर काम ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी महापालिकांनी स्वनिधीतून पूर्ण करावे, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, महापालिकेने पंचक येथील ३२ एमएलडी तर आगरटाकळी येथील ४० एमएलडी मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण केले. दरम्यान, मंगळवारी (दि.२०) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन केंद्राचे संपूर्ण अनुदान न मिळालेल्या १८ प्रकल्पांना राज्य शासनाकडून अनुदान देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार, केंद्राच्या हिश्श्यापोटी देय निधीपैकी ८० टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळणार असून उर्वरित २० टक्के भार महापालिकेला उचलावा लागणार आहे. मात्र, प्रकल्पनिहाय निर्णय घेण्याचे अधिकार नगरविकास विभागाला देण्यात आले आहेत.