मनसे आता नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी ; सलुनला परवानगीसाठी जिल्हाध्यिकाऱ्यांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 06:19 PM2020-06-15T18:19:57+5:302020-06-15T18:28:09+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनराज्यातील मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आता नाभिक व्यावसायिकांनाही समर्थन दिले असून सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली यासाठी नाशिक शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध आस्थापना व व्यवसाय गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जवळपास बंद आहे. सध्या सरकारी पातळीवर काही व्यावसायिक निर्बंध शिथिल करण्यात येत असून अजून काही व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. त्यात राज्यभरातील नाभिक समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे सलून सध्या पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सर्वस्वी सलूनवर अवलंबून असलेल्या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. समाजाचाच एक महत्वाचा घटक असलेल्या नाभिक समाजाला जनसामान्यांच्या आरोग्याबाबत आपल्या जबाबदारीची पूर्ण कल्पना असून शासनाने मंजुर केलेल्या सर्व खबरदाऱ्या घेऊन व्यवसाय सुरु करण्यास नाभिक समाजास मंजुरी दिल्यास निम्न मध्यमवर्गीय असलेल्या या समाजावरील उपासमारी दूर होईल. नाभिक समाजावरील अन्याय दूर करून सलून सुरु करण्यास मंजुरी देऊन नाभिक समाजाला दिलासा मिळवून द्यावा असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अंकुश पवार, सागर कोठावदे, विजय आगळे, राम बिडवे, बबलू ठाकूर हे उपस्थित होते.