उद्दिष्ट पूर्ण करून वंचितांची कामे मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:19+5:302021-02-06T04:26:19+5:30
शहरातील अग्रेसन भवनातील सभागृहात पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ...
शहरातील अग्रेसन भवनातील सभागृहात पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंद पिंगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) इशाधीन शेळकंदे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, कार्यकारी अधिकारी श्रीमती सुनंदा नरवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी सुबोध मोरे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरणे शिंदे यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.
योजना प्रस्तावित करताना पुढील ३० वर्षांतील लोकसंख्या विचारात घेण्याच्या सूचना करताना मंत्री भुसे म्हणाले, जिल्ह्याच्या तुलनेत घरकुल योजनेत मालेगाव तालुका सर्वात मागे आहे. त्यामुळे सर्व योजनांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी. होणारे प्रत्येक काम दर्जेदार व्हावे. निधीचा अथवा कुठल्याही गोष्टीचा अडथळा येत असेल त्याबाबतीत पाठपुरावा करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तालुक्यातील ग्रामीण भागातील योजनांपैकी मुख्यमंत्री पेयजल योजना, १४ वा व १५ वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, ठक्करबाप्पा योजना, बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत भवन बांधकाम, जनसुविधा व नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र विकास, बांधकाम विभागातील मागील तीन वर्षांतील पूर्ण व अपूर्ण कामांचा आढावा, लघु पाटबंधारे विभागातील मागील तीन वर्षांतील पूर्ण व अपूर्ण कामांचा आढावा तसेच अतिक्रमित जमिनींना नियमित करण्याबाबत योजनांचा आढावा मंत्री भुसे यांनी यावेळी घेतला.