गेटमनच्या सतर्कतेने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:21 AM2019-08-06T01:21:17+5:302019-08-06T01:21:42+5:30
देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे मोरीखालील भराव अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मोरीवरील रेल्वे पूल रुळ व स्लीपर लटकत असल्याचे रेल्वे गेटमनच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी मोरीखालील भराव वाहून गेल्याचे रेल्वे प्रशासनाला समजल्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत युद्धपातळीवर रेल्वे मोरी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली.
नाशिकरोड : देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे मोरीखालील भराव अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मोरीवरील रेल्वे पूल रुळ व स्लीपर लटकत असल्याचे रेल्वे गेटमनच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी मोरीखालील भराव वाहून गेल्याचे रेल्वे प्रशासनाला समजल्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत युद्धपातळीवर रेल्वे मोरी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली.
मुसळधार पावसामुळे देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे गेट ८४ येथील गेटमन शिवाजी मालुंजकर हे आपल्या हद्दीतील रेल्वे लाईन व मोरीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान १७८/६-८ या रेल्वे मोरीचा एक भाग मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचे लक्षात आले. मोरीच्या एका बाजूचा भराव वाहून गेल्याने तेथील रेल्वे रुळ व त्याखालील लोखंडी स्लीपर्स लटकत होते. सदर बाब मालुंजकर यांनी तातडीने देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाच्या अधीक्षकांना कळवली. सदर घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे बांधकाम विभागाचे अभियंता, रेल्वे अधिकारी आदींनी लहवित जवळील रेल्वे मोरीची पाहणी केली. गेटमन मालुंजकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला. रेल्वे प्रशासनाने तत्काळ आपद्ग्रस्त रेल्वे बोगीतून सीमेंट, खडी आदी साहित्य आणून दुरु स्तीचे काम हाती घेतले. रविवारी दुपारी सुरू झालेले मोरी दुरु स्तीचे काम सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आटोपले. दरम्यान मुंबई-नाशिक दरम्यानची रेल्वे सेवा पावसामुळे बंद असल्याने रेल्वे मोरी भराव दुरु स्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करता आले. त्यानंतर नाशिकरोडहून पहिली गोदावरी एक्स्प्रेस ही मुंबईला सहीसलामत रवाना झाली.
पाहणी करताना आले निदर्शनास
अतिवृष्टीमुळे लहवित जवळील रेल्वे गेट ८४ चे गेटमन शिवाजी मालुंजकर आपल्या हद्दीत भर पावसात पाहणी करीत असताना त्यांना मोरी खालील भराव वाहून गेल्याचे निदर्शनास आले. मालुंजकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.