भाजपा आमदाराच्या घरासमोर घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 07:12 PM2019-03-07T19:12:40+5:302019-03-07T19:13:25+5:30
शहरातील धार्मिक स्थळे हटवू नये यासाठी बुधवारी मंदिर बचाव समितीने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीस शहरातील तिन्ही आमदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याची सुरुवात पंचवटी या धार्मिकस्थळाचे आमदार असलेले बाळासाहेब सानप यांच्यापासून करण्यात आली.
नाशिक : नाशिक शहरातील विविध ठिकाणी असलेली मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मनपाच्या आदेशाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र वारकरी संघ, पुरोहित महासंघ, मंदिर मठ बचाव समितीच्या सदस्यांनी गुरुवारी सकाळी पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर सुमारे अर्धा तास घंटानाद आंदोलन करून ‘श्री राम जय राम जय जय राम’ असा जयघोष केला.
शहरातील धार्मिक स्थळे हटवू नये यासाठी बुधवारी मंदिर बचाव समितीने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीस शहरातील तिन्ही आमदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याची सुरुवात पंचवटी या धार्मिकस्थळाचे आमदार असलेले बाळासाहेब सानप यांच्यापासून करण्यात आली. मंदिर बचाव समितीच्या सदस्यांनी सकाळी घंटानाद सुरू केला. आंदोलन सुरू असताना सानप हे कार्यालयात येताच आंदोलन करणाऱ्यांनी त्यांना मंदिर वाचविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन केले. यावेळी सानप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत शहरातील सर्व मंदिरे तसेच मठ वाचविण्यासाठी येत्या काही दिवसांत पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे. मंदिराचा प्रशासनाने सर्व्हे केला आहे, परंतु तो अत्यंत चुकीचा आहे. सर्व्हे करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती कळविली आहे, असे सांगत उद्या शुक्रवारी रामायण बंगल्यावर तिन्ही आमदार, महापौर आणि मंदिर बचाव समिती सदस्य यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शहरात अनेक पुरातन मंदिरे असून, या मंदिरांमुळे संस्कृती टिकून आहे. प्रशासन मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मंदिरे धर्माचे रक्षण करण्यासाठी असून मंदिरे वाचविणे काळाची गरज आहे, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सतीश शुक्ल, रामसिंग बावरी, कैलास देशमुख, नंदू कहार, प्रवीण जाधव, विजय पवार, मोहन गोसावी, ब्रह्मचारी मारुतीनंद महाराज आदींसह विश्व हिंदू परिषद, वारकरी संघ व मंदिर मठ बचाव समिती सदस्य उपस्थित होते.