तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषय वगळण्याचा घाट

By admin | Published: September 21, 2016 12:09 AM2016-09-21T00:09:59+5:302016-09-21T00:11:13+5:30

शिक्षकांकडून विरोध : वैज्ञानिक संकल्पनाही होणार कमी

Ghat to exclude science subjects from Polytechnics | तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषय वगळण्याचा घाट

तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषय वगळण्याचा घाट

Next

नाशिक : विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया मानला जात असतानाही तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषयाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकारास विज्ञान शिक्षकांकडून तीव्र विरोध केला जात असला तरी अद्यापही महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. नव्या शिक्षणप्रणालीतून विज्ञानच्या अनेक शाखांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, राज्यभरातून त्याविरोधात पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्डाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. या बोर्डाकडून दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करून त्यास सुसंगत आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार सन २०१७/१८ पासून सुधारित ‘आय’ अभ्यासप्रणाली लागू करण्यात येणार आहे. मात्र या अभ्यासप्रणातील विज्ञान शाखेचे महत्त्व कमी करण्यात आल्याचा आरोप विज्ञान शिक्षकांकडून होत आहे.नवीन अभ्यासक्रम प्रणालीत विज्ञान हा विषय जो आजवर सर्व तंत्रनिकेतन शाखेसाठी प्रथम आणि द्वितीय सत्रात शिकविला जात होता तो मार्यादित करण्यात आला आहे. सदर विषय आता केवळ प्रथम सत्र म्हणजे सहा महिनेच शिकविण्यात येणार असून, उर्वरित सहा महिने संगणक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेसाठी देण्यात आले आहेत. तसेच विज्ञानाचे काही घटक हे इतर तांत्रिक विषयांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या निर्णयाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया असल्याने सदर विषय पदविका अभ्यासक्रमातून कमी करू नये, अशी भूमिका तज्ज्ञांनी घेतली आहे. त्यांच्या मते आजवर पदविका अभ्यासक्रमात विज्ञान समाविष्ट असणे हे त्या विषयाचे महत्त्व स्पष्ट करणारे आहे. एका बाजूला केंद्र सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक शिक्षणाचे महत्त्व व तंत्रज्ञानाची स्वप्ने दाखवित असताना महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्ड विज्ञानचे महत्त्व कमी करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेली २५ ते ३० वर्ष विज्ञान विषय अभ्यासक्रम असताना अचानकपणे ते वगळण्यात येऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. विज्ञान हा विषय दोन्ही सत्रात ठेवून विद्यार्थ्यांचे सामान्य विज्ञान व वैज्ञानिक संज्ञा पक्के करून त्यानंतरच त्यावर आधारित तांत्रिक विषय शिकविल्यास विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ghat to exclude science subjects from Polytechnics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.