योजना अपूर्णावस्थेत असूनही पाणीपट्टी वाढविण्याचा घाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:42 PM2020-07-24T21:42:02+5:302020-07-25T01:08:51+5:30
चांदवड : शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपयाची स्वतंत्र पाणी योजना ओझरखेड धरणातून मंजूर करण्यात आली असतानाही नगर परिषद प्रशासनाने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवून पाणीपट्टी वाढविण्याचा घाट घातला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
चांदवड : शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपयाची स्वतंत्र पाणी योजना ओझरखेड धरणातून मंजूर करण्यात आली असतानाही नगर परिषद प्रशासनाने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवून पाणीपट्टी वाढविण्याचा घाट घातला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाने पाणीपट्टीवाढी-संदर्भातील उपविधी तयार करून नगरसेवकांच्या बैठकीपूर्वी ही उपविधी पाठवून दिल्याने नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, तर सर्वसामान्य नागरिकांना ही पाणीपट्टी सध्या ११०० रुपये असताना सुमारे ४५०० रुपये वार्षिक येईल त्यामुळे बैठकीस व पाणीपट्टी वाढविण्यास सर्व नगरसेवकांनी विरोधाचे पत्र दिले. या पत्राची प्रत मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी यांना पाठविल्या आहेत. कोरोनामुळे आधीच व्यापारी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना त्यात ही दरवाढ लादू नये, असेही पत्रात म्हटले आहे.
नळजोडणी पूर्ण होईपर्यंत हा निर्णय रद्द करा
योजनेच काम अद्याप काम सुरू आहे. परंतु हे काम किती प्रगतिपथावर आहे यासंदर्भात सभागृहाला माहिती दिली जात नाही. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नळजोडणीसंदर्भात विचारणा केली असता नळजोडणीसाठी जिल्हाधिकारी टेंडरला परवानगी देत नाही, अशी माहिती मिळत आहे. जी योजना अपूर्ण आहे ती केव्हा पूर्ण होईल माहीत नाही. या योजनेचे नळजोडणी टेंडर अद्यापपर्यंत झाले नाही. नागरिकांना प्रत्यक्षात पाणी केव्हा मिळेल हे माहीत नसल्याने वाढीव पाणीपट्टी नागरिक कसे भरतील, आदी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले.
मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकारात तयार केलेल्या उपविधीस व दरपत्रकास उपविधीत नमूद केल्याप्रमाणे दर निश्चित केल्याचे लक्षात आल्याने सर्व नगरसेवकांनी विरोध केला. ही योजना पूर्ण झाल्यानंतर नगर परिषद हद्दीतील सर्व नळजोडणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना योजनेचा अनुभव घेऊ द्या, त्यानंतर नागरिकांना परवडेल, अशी दर व उपविधीत सर्व नगरसेवकांच्या संमतीने सभागृहात ठरविण्यात यावे, पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत हा निर्णय रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
सर्व नगरसेवकांची याबाबतची विशेष सभा दि.२४ जुलै रोजी घेण्यात येणार होती. मात्र ती होण्याआधीच प्रशासनाने पाणीपुरवठा व पाणीपट्टीची उपविधी तयार करून सर्वांना पाठविली. त्यास सर्वांनी विरोध केला तर या दरपत्रकाविषयी व उपविधी विषय सभागृहात अद्यापपर्यंत नगरसेवकांना व सभागृहात कोणतीही माहिती न देता तयार केली.
नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पाणीपुरवठा सभापती व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कविता उगले, बाळू वाघ, शालिनी भालेराव, प्रवीण हेडा, जयश्री हांडगे, नवनाथ आहेर, अश्पाक इसाक खान, अल्ताफ तांबोळी, इंदूबाई वाघ, सुनीता पवार, रवींद्र अहिरे, मीना कोतवाल, देवीदास शेलार, पार्वताबाई पारवे, लीलाबाई कोतवाल, राजकुमार संकलेचा या नगरसेवकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.