आई, बाबांची माफी मागून घाटकोपरच्या युवतीने हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून स्वत:ला झोकून दिले
By अझहर शेख | Published: April 9, 2024 04:08 PM2024-04-09T16:08:34+5:302024-04-09T16:09:29+5:30
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून सुमारे १४००फूट खाली स्वत:ला झोेकून देत आयुष्याचा प्रवास थांबविला.
अझहर शेख, नाशिक : ‘आई, बाबा मला माफ करा, मी खूप विचार करून हे सर्व करत आहे...त्याबद्दल मला माफ करा, मला कोणीही मदत करू शकले नाही...मला खुप काही सांगायचे आहे, पण ते सांगू शकत नाही, शब्दांत व्यक्त करणे खूप अवघड आहे... मी प्रार्थना करते की जगात असे पाऊल कोणीही उचलू नये...’ अशा अत्यंत भावनिक शब्दांत तिने अखेरच्या क्षणी दोन पानी ‘सुसाइट नोट’मध्ये मन हलकं केलं पण मनाला सावरू शकली नाही अन् हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून सुमारे १४००फूट खाली स्वत:ला झोेकून देत आयुष्याचा प्रवास थांबविला.
अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई गावातून वाटाड्यालासोबत घेत अवनी मावजी भानुशाली (२२,रा. महालक्ष्मी हौं.सोसा.घाटकोपर, मुंबई) ही युवती रविवारी (दि.७) दुपारी कोकणकड्यावर पोहचली. अडीच वाजेच्या सुमारास तीने पाठीवरील बॅग तेथेच काढून कोकणकड्याच्या उजव्या बाजूकडे जात खाली उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. वाटाड्याच्या ही बाब लक्षात येताच त्याने धाव घेतली; मात्र तोपर्यंत ती कोकणकड्यावरून नजरेआड झाली होती. त्याने तातडीने राजुर पोलिस, पुण्याचे गिर्यारोहक रेस्क्यू समन्वयक ओंकार ओक यांना घटना कळविली. ओक यांनी त्वरित समन्वय करत पोलिस, वन्यजीव विभागासोबत संपर्क करून माहिती घेत नाशिक क्लायम्बर्स ॲन्ड रेस्क्युअर्स असोसिएशनचे गिर्यारोहक दयानंद कोळी, लोणावळ्याचे गिर्यारोहक गणेश गीद यांच्याशी संपर्क साधून रेस्क्यू मोहिमेवर जाण्याची तयारी करण्यास सांगितले. सोमवारी (दि.८) सुमारे नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर अवनीचा मृतदेह कोकणकड्यावरून गडावर आणला गेला. याप्रकरणी तिचे वडील मावजी भानुशाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजुर पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राजुर पोलिस करत आहेत.
नाशिकची तनया, मुरबाडच्या दिपकचे मोठे धाडस
नाशिकची साहसी युवा गिर्यारोहक तनया दयानंद कोळी, मुरबाडच्या चमुमधील दिपक विसे हे एकापाठोपाठ रोप व हर्नेस लावून कोकणकड्यावरून थेट १४००फुट खाली दरीत उतरले. रणरणत्या उन्हामध्ये या दोघांनी मोठे साहस करून अवनीचा मृतदेह शोधून शव बॅगेत टाकला. प्रशिक्षणातील घेतलेल्या धड्यानुसार मृतदेह स्ट्रेचरवर व्यवस्थित बांधून दुपारी २ वाजता वॉकीटॉकीवरून बॅकअप चमूला दोरखंडाच्या सहाय्याने मृतदेह वर खेचण्याचा ‘कॉल’ दिला. तब्बल दोन ते अडीच तासांच्या कसरतीनंतर हा मृतदेह गडावर आणण्यास बचावपथकाला यश आले.