गझलकार कमलाकर देसले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 01:41 AM2022-06-04T01:41:18+5:302022-06-04T01:47:33+5:30
जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
नाशिक : जीवनविषयक तत्त्वज्ञान आपल्या साहित्यातून सशक्तपणे मांडणारे झोडगे, ता. मालेगाव येथील गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे शुक्रवारी (दि.३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कमलाकर आत्माराम देसले यांचा जन्म २४ मे १९६३ रोजी झाला. एम. ए. बी.एड. पदवी घेतलेले देसले यांनी दीर्घकाळ झोडगे येथील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. देसले यांचे ‘ ज्ञानिया तुझे पायी’, ‘काळाचा जरासा घास’ हा गझलसंग्रह, कवी खलील मोमीन व कमलाकर देसले यांच्यात प्रदीर्घ काळ चाललेल्या कवितेतल्या पत्रव्यवहारावर आधारित ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘काही श्वास विश्वासाठी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिकांमधूनही सातत्याने लेखन केले. त्यात लोकमतमध्ये लिहिलेले ‘अन्वयाचेनी आधारे’ हे स्तंभलेखनही गाजले. याशिवाय नवरस, सगुण-निर्गुण, अन्वयाची फांदी, प्रकट गुह्य बोले, मशागत हे स्तंभलेखन त्यांनी विविध वृत्तपत्रांतून केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. (द्वितीय)अभ्यासक्रमात त्यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला होता तर पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमात देखील तीन गझलांचा समावेश होता. काही ग्रंथांचे त्यांनी संपादन व अनुवादही केले होते. देसले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात सह्याद्री वाहिनी व रंगबावरी संस्था मुंबईचा महाकवी कालिदास राज्यस्तरीय पुरस्कार, धरणगावचा राज्यस्तरीय बालकवी पुरस्कार, उदगीरचा राज्यस्तरीय साहित्य प्रबोधन पुरस्कार, नांदगावचा राज्यस्तरीय समता काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार, नाशिकच्या सावानाचा कवी गोविंद पुरस्कार, साहित्य सावाना पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, माउली साहित्य भूषण पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनी पुण्याचा अध्यापकोत्तम पुरस्कार, कसमादे गौरव पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कवी देसले यांनी चित्रपटांसाठीही गीतलेखन केले आहे.
‘मोल' या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले असून त्यांची गीते गायक सुरेश वाडकर, केतकी माटेगावकर, मंदार आपटे यांनी गायिली आहेत. 'ओ तुनी माय' या अहिराणी चित्रपटासाठी गीतलेखन तसेच संजय बानुबाकोडे यांनी संगीतबद्ध केलेल्या
‘हीच माझी दौलत’ या अल्बमसाठी गझललेखन केले आहे. ज्ञानेश्वरीवर, कवितेवर त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने दिली आहेत. रसाळ व मधुर वाणीतून त्यांची होणारी व्याख्याने श्रोत्यांना नेहमीच भावली.