सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळण बनले धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 05:10 PM2021-01-01T17:10:03+5:302021-01-01T17:11:05+5:30
सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळणावर सातत्याने होत असलेल्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे हे वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या वळणावर तातडीने संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
या वळणावर तीव्र उतार असल्याने व संरक्षक कठडे नसल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. सिन्नरकडून येणारी अनेक वाहने खोल दरीत जाऊन अपघात घडलेले आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सिन्नरकडून घोटीच्या दिशेने जी वाहने जातात, त्यांचा वेग उतार असल्याने जास्त असतो. घोटीकडून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी असतो. त्यामुळे सिन्नरकडून येणाऱ्या वाहनाला अंदाज येत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता जास्त असते. या घाटमार्गाने प्रवास करावा की नको, असा प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे. वारंवार मागणी केल्यानंतर दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. तथापि, वाहनधारकांसाठी फक्त दिशादर्शक फलक पुरेसे नसून संरक्षक कठडे तातडीने बसविण्याची गरज आहे.