घोरवड घाटाची कचरा डेपोसारखी अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:36+5:302021-03-07T04:13:36+5:30
सिन्नर-घोटी महामार्गावरील प्रवाशांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जात ...
सिन्नर-घोटी महामार्गावरील प्रवाशांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे घाटातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाटात कचरा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. येथे मेलेल्या कोंबड्या, कोंबड्याच्या खताच्या गोण्या, सडलेला भाजीपाला, मृत पावलेले पाळीव जनावरेसुद्धा टाकले जातात. प्लास्टिकसह अन्य कचरा टाकला जातो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याने या घाटाचे सौंदर्य लोप पावत आहे.
गोण्यांमध्ये दुर्गंधीयुक्त कचरा भरून तेथे टाकला जातो. त्यामुळे अजूनही दुर्गंधी सुटते. या दुर्गंधीचा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पर्यटकही येथे थांबत नाहीत. रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी घाटांमधील रस्त्यांचे सुशोभिकरण केले जाते. परंतु, घोरवड घाट याला अपवाद ठरत आहे.
कोणीतरी अज्ञात रस्त्याच्या कडेला कचरा व घाण टाकतात. त्यामुळे घाटांचे विद्रूपीकरण होत असून जो कोणी कचरा, घाण टाकतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
घोरवड हा घाट अत्यंत रहदारीचा मानला जातो. घाटाच्या जवळच पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आल्याने पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. परंतु, कचऱ्याची दुर्गंधी पसरलेली असल्याने ते तेथे थांबत नाहीत. त्यांचा हिरमोड होतो. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीने जाणारे भाविक याच घाटाने जातात. त्यांनासुद्धा या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------------
मुंबईहून येणारे काही लोक केमिकलचे टँकर, मृत कोंबड्या घाटात फेकतात. त्याचीही दुर्गंधी पसरते. यापूर्वी वनविभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.
-रमेश हगवणे, माजी सरपंच, घोरवड
सिन्नर-घोटी रस्त्यावरील घोरवड घाटात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.