घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:45 PM2020-02-12T23:45:42+5:302020-02-12T23:59:49+5:30
नाशिक : घोटी ग्रामपंचायतीत थेट नागरिकांमधून निवडून आलेले सरपंच मनोहर भिकाजी घोडे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे ...
नाशिक : घोटी ग्रामपंचायतीत थेट नागरिकांमधून निवडून आलेले सरपंच मनोहर भिकाजी घोडे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी अंगणवाडीसेविकांनी केलेल्या जन्म-मृत्यूच्या नोंदीचा पुरावा ग्राह्य धरला आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे पद रद्द होण्याचा हा पहिलाच प्रकार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने या निर्णयात बदल केल्यामुळे सदस्यांमधूनच सरपंचाची निवड होण्याची चर्चा होत आहे.
घोटी ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जुलै २०१९ रोजी झाली. थेट जनतेतून सरपंच निवडून द्यावयाचा असल्याने मनोहर घोडे व धोंडीराम कौले याही निवडणूक लढविली होती. त्यात मनोहर घोडे हे विजयी झाले होते. परंतु नामांकन छाननीवेळी कौले यांनी घोडे यांच्या अर्जावर हरकत घेऊन त्यांना तीन अपत्ये असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे कौले यांनी सागर यांच्याकडे अपील दाखल केले. कौले यांच्या वतीने अॅड. सतीश भगत यांनी युक्तिवाद केला.
ग्रामपंचायत निवडणुकीत १२ सप्टेंबर २००१ नंतर तीन अपत्ये असलेल्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातलेली असताना घोडे यांना २००१ नंतर तीन अपत्ये झाल्याची तक्रार कौले यांनी करून तसे पुरावे सादर केले होते. त्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदवहीचे पुरावेही सादर केले होते. या अपिलाची सुनावणी होऊन घोडे यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद करून त्यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले.