घोटी खुर्दच्या सरपंच पदच्युत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:43 PM2020-06-26T22:43:59+5:302020-06-27T01:33:49+5:30
इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.
माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी गोडसे यांच्या विरोधात जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. वर्षभरापासून अनेकदा झालेल्या सुनावण्यांद्वारे दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने गोडसे यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या जातीचा दावा अवैध ठरविला.
घोटी खुर्द येथील मंदाकिनी गोडसे यांनी इतर मागास प्रवर्गातील हिंदू कुणबी जातीच्या दाखल्यावर थेट सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. गोडसे यांनी नामनिर्देशन पत्र भरताना कुणबी जातीचे नसताना खोटे पुरावे, खोटे प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र सादर केले होते. गोडसे यांनी जातप्रमाणपत्र काढताना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींच्या जातीच्या पुराव्यांचा गैरवापर केला होता. याबाबत तक्र ारदार माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी पुरावे सादर केले होते.
प्रांताधिकाऱ्यांची दिशाभूल करून गोडसे यांनी कुणबी जातीचा दाखला घेतला होता. माझ्याकडील पुराव्यांच्या बळावर न्यायदेवतेने गोडसे यांचे पितळ उघडे पाडले. हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे, असे मी समजतो.
- आत्माराम फोकणे, तक्र ारदार