घोटी ग्रामपालिका ठोकणार टोल नाक्याला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 08:32 PM2021-01-15T20:32:25+5:302021-01-16T01:13:35+5:30
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्याने मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने घोटी ग्रामपालिका येत्या सोमवारी ( दि. १८) टोल नाक्यालाच टाळे लावणार असल्याचे अधिकृत पत्र ग्रामपालिकेने टोल नाका प्रशासनाला दिले आहे.
ग्रामपालिकेने पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम २४ महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० भाग २ पोट व नियम १५ अन्वये शासन निर्णयानुसार निवासी व व्यावसायिक बांधकामाची कर आकारणी केल्यानुसार टोल नाका, स्टोअर रूम, टोल नाका शेड या मिळकतीची एकूण थकबाकी ७ लाख ९२ हजार ३२० रुपये टोल नाका व्यवस्थापनाने अद्याप भरलेली नाही. याबाबत घोटी ग्रामपालिका कार्यालयाने दि. २५ सप्टेंबर, २०२० रोजी नोटिसीद्वारे टोल नाका प्रशासनाला कळविले होते. मात्र, अद्यापपर्यंत रक्कम अदा करण्यात आली नसल्याने ग्रामपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सदर रक्कम वसूल करण्यासाठी घोटी ग्रामपालिकेने दि. १८ रोजी घोटी येथील टोल नाक्यास टाळे ठोकणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी दिली.