१० हजार विद्यार्थ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:26 AM2017-07-25T00:26:12+5:302017-07-25T00:26:46+5:30
नाशिक : पाणी आणि वायुप्रदूषणाची समस्या असल्याने आगामी पिढीला या प्रदूषणाची जाणीव व्हावी त्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी तत्पर असावे, असा संदेश घेऊन निघालेली सायन्स ट्रेन नाशिकमध्ये दाखल झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देशापुढे पाणी आणि वायुप्रदूषणाची मोठी समस्या असल्याने आगामी पिढीला या प्रदूषणाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी तत्पर असावे, असा संदेश घेऊन निघालेली सायन्स ट्रेन नाशिकमध्ये दाखल झाली असून, पहिल्याच दिवशी शहरातील सुमारे १०,४२६ विद्यार्थ्यांनी सायन्स ट्रेनला भेट दिली. या ट्रेनमध्ये असलेल्या सुमारे ३०० मॉडेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सायन्स ट्रेन देशभर फिरून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करीत आहे. या ट्रेन आत्तापर्यंत १ लाख ५६ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. नाशिकरोड येथील प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे सध्या ही ट्रेन नागरिकांना पर्यावरण जागृतीचा संदेश देत आहे. गेल्या आठ वर्षांपासून विज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये जागृती करणाऱ्या या उपक्रमांतर्गत यंदा पाणी आणि वातारवरणातील प्रदूषणावर जागृती मोहीम सुरू केली आहे. पाण्याचे प्रदूषण ही देशापुढील वाढती समस्या आहे. पाणी प्रदूषणाचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकणार असल्याने त्याबाबत आताच दक्ष राहण्याच्या दृष्टीने ही सायन्स एक्स्प्रेस तरुणांमध्ये जनजागृती करीत आहे.
हवामानातील रचनेत होणाऱ्या बदलांमुळे शेती उत्पादनावर होणारा परिणाम, समुद्राच्या स्तरात होत असलेली धोकादायक वाढ याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. या प्रदूषणाचे परिणाम सर्वसामान्यांना समजावेत यासाठी नवीन पिढीला साक्षर केले जात आहे. पाणीप्रदूषणामुळे जागतिक पातळीवर मोठा धोका निर्माण झाला असून, त्याबाबतचे उपाय आणि उपचार याविषयी १३ डब्यांच्या या एक्स्प्रेसमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. यापूर्वी या एक्स्प्रेसच्या माध्यमातून जैवविविधतेविषयी देशभर जागृती अभियान चालविले होते. आता पाणी आणि हवाप्रदूषणाची जनजागृती केली जात आहे.
लिम्का बुकमध्ये १२ वेळा झाली नोंद
सायन्स ट्रेनने आत्तापर्यंत १ लाख ५६ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. आठवेळा विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून ट्रेन देशभर फिरत आहे. देशभरातील ५० स्थानकांवर सायन्स ट्रेनला थांबा देण्यात आला असून, दोन दिवस तेथील नागरिकांसाठी प्रदर्शन खुले असते. आत्तापर्यंत १.६८ करोड नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे. सर्वात मोठे प्रदर्शन आणि सर्वाधिक प्रदर्शन पाहणाऱ्यांची संख्या असलेले हे प्रदर्शन तब्बल १२ वेळा लिम्का बुकमध्ये नोंदले गेले आहे. विज्ञान राणी म्हणून या गाडीचा देशभर गौरव केला जातो.
नाशिककरांनी मागीलवर्षीप्रमाणेच यंदाही मोठा प्रतिसाद दिला आहे. पहिल्याच दिवशी ४२ शाळांमधील १० हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे. उद्या मंगळवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, यापेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. १३ डब्यांच्या या प्रदर्शनात तरुण पिढीला जागृत करण्याची संकल्पना आहे. तरुणांकडून यास प्रतिसाद लाभत आहे.
- रुबल बोरा, व्यवस्थापक, विज्ञान एक्स्प्रेस