शिवसेनेचे बंड शमविण्यासाठी गिरीश महाजन नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:45 AM2019-10-15T01:45:04+5:302019-10-15T01:46:13+5:30
विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती असली तरी नाशिकमध्ये मात्र काही ठिकाणी वेगळे चित्र दिसत आहे. नाशिक शहरात एकूण चार पैकी तीन मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार आहेत. मात्र युती असूनही शिवसेनेचे मात्र पाठबळ मिळताना दिसत नाही. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीच्या विरोधात शिवसेनेने बंडखोरी करून युतीला आव्हान दिले आहे. यासंदर्भात थेट उघडपणे भाजपाच्या विरोधाची भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे भाजपाने त्यासंदर्भात तक्रारी केल्यानंतर त्यांनी शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली, मात्र त्यांना बंड शमविता न आल्याने त्यांनी थेट शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात चेंडू टोलावला. परंतु उद्धव ठाकरे यांनीदेखील याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अजूनही तिढा कायम आहे. निवडणूक अवघ्या चार ते पाच दिवसांवर आली असतानादेखील त्याबाबत निर्णय न झाल्याने आता तातडीने
निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
केवळ नाशिक पश्चिममध्येच नाही तर अन्य मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांसाठी शिवसेनेची सक्रियता जेमतेमच आहे.
भाजपातील नाराजांनाही तंबी?
भाजपाच्या विरोधात केवळ शिवसेनेचीच नाराजी आहे असे नाही तर भाजपा अंतर्गतदेखील राजी-नाराजी दिसत आहे. नाशिक पूर्व आणि मध्य मतदारसंघातदेखील पक्षाचे अनेक कार्यकर्ते, नगरसेवक प्रचारासाठी बाहेर पडलेले नाही. त्याबाबत उघडपणे चर्चा होत असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन पक्षातील नाराजांनादेखील तंबी दिल्याचे वृत्त आहे.