''मोदींच्या सभेत युतीची घोषणा नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:27 AM2019-09-17T04:27:13+5:302019-09-17T04:27:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गुरुवारी तपोवनात होणाऱ्या सभेद्वारे भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गुरुवारी तपोवनात होणाऱ्या सभेद्वारे भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. मात्र, महाजनादेश यात्रा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्याने त्याच्या समारोप सोहळ्यात शिवसेनेशी युती किंवा त्यासंबंधित कोणतीही घोषणा होणार नाही, असे जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
तपोवनात गुरुवारी सकाळी ११.३० वाजता होणाºया पंतप्रधानांच्या सभेद्वारे महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. या सभेद्वारे राज्यभरात झालेल्या महाजनादेश यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले आणि राज्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता होणार आहे. पंतप्रधान विमानाने ओझरला, तिथून हेलिकॉप्टरने क्रीडा संकुलातील हेलीपॅडवर आणि तिथून तपोवनातील सभास्थानी दाखल होणार आहेत.
>मोठ्या प्रवेशासाठी कुणीच उरले नाही
यात्रा समारोप सोहळ्यात कोणताही मोठा प्रवेशसोहळा होणार नाही. कारण आता छत्रपतींचे दोन वंशजदेखील आमच्याकडे आल्याने आता कुणीही मोठा विरोधकांकडे उरलाच नसल्याचे महाजन म्हणाले. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीला आमच्या शुभेच्छा आहेत.
>मित्रपक्ष अधिक असल्याने वेळ
पक्षसंघटनेचा भाग म्हणून २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवारांची चाचपणी करण्याचे काम भाजपाप्रमाणेच शिवसेनादेखील करीत आहे, त्यात गैर काहीच नाही. युतीबाबतची चर्चा ही शिवसेना अध्यक्ष आणि मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील तसेच पक्षाध्यक्षांशीच केली जाणार असल्याने त्याचा निर्णय कधी होईल, ते सांगता येणार नाही. पण युतीत अन्य पक्ष अधिक असल्याने जागा निश्चिती आणि अन्य बाबींवरील चर्चा लांबली असल्याचे महाजन यांनी नमूद केले.
>केवळ १५-२० नवागतांना उमेदवारी
पक्षात नव्याने दाखल झालेल्यांपैकी केवळ १५ ते २० उमेदवारांनाच भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे पक्षात पूर्वीपासून असलेल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. शिवेंद्रराजे, गणेश नाईक यांच्यासारख्या आपापल्या मतदारसंघात चांगले काम आणि नाव असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.