गिरीष महाजन यांनी दुभाजकावरुन उडी घेत आरोग्य विद्यापीठ निदर्शकांचे ऐकले गा-हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 08:25 PM2018-02-25T20:25:10+5:302018-02-25T20:25:10+5:30
महाजन यांची मुलाखत अंतीम टप्प्यात सुरू असताना काही महिला कामगारांनी सभागृहात एकत्र उठून हातातील ‘जवाब दो’ पत्रक झळकवित आम्हांला न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समान वेतन लागू करावा, कंत्राटी कामगारांना नियमीत सेवेत कायम करावे, आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या प्रशासनाकडून होणारा भेदभावाला आळा घालावा, अशा विविध मागण्यांसाठी सीटू संलग्न महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने सावानाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी वैद्यकिय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी निदर्शकांची भर रस्त्यात भेट घेऊन गा-हाणे ऐकले.
नियमीत कर्मचारी व कंत्राटी कर्मचा-यांच्या कामाचे स्वरुप समान असून त्यांच्या लाभामध्ये मात्र मोठी तफावत आहे. कामगार उपआयुक्तांकडे वारंवार तक्रारी करुनदेखील विद्यापीठाच्या कंत्राटी कामगारांना न्याया मिळू शकलेला नाही. विद्यापीठ प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे होत असलेले उल्लंघन व नऊ कर्मचा-यांना प्रशासनाने कामावरुन कमी केल्याचा आरोप संघटनेने महाजन यांना सोपविलेल्या निवेदनातून केला आहे. विद्यापीठामधील कंत्राटीपध्दतीने कामगार भरण्याची पध्दतील प्रतिबंध करावा तसेच सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत समावून घ्यावे. तसेच घरभाडे भत्ता पुर्वलक्ष प्रभावाने आपल्या पत्रानुसार मिळवून द्यावा, कामगारांना पगाराची पावती व २६ दिवसांचे वेतनाची रक्कम अदा करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्काराने रविवारी (दि.२६) गौरविण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तत्पुर्वी महाजन यांची मुलाखत अंतीम टप्प्यात सुरू असताना काही महिला कामगारांनी सभागृहात एकत्र उठून हातातील ‘जवाब दो’ पत्रक झळकवित आम्हांला न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यामुळे मुलाखतीत व्यत्यय आला अखेर महाजन यांनी ‘ही पध्दत चुकीची असून अशा पध्दतीने कार्यक्रमात व्यत्यय आणणे गैर आहे, मी कार्यक्रमानंतर भेट घेतो’ असे सांगितले. यानंतर सर्व महिला कामगारांनी सभागृह सोडले.
भर रस्त्यात साधला संवाद
सोहळाआटोपून महाजन हे सभागृहाबाहेर आले असता शिष्टमंडळाने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सावानासमोर भर रस्त्यावर रणरणत्या उन्हात फलक घेऊन उभे असलेले निदर्शक बघून महाजन यांनी ‘यांचे नेमके काय म्हणणे आहे’ असे सांगत त्यांच्या दिशेने जाण्यासाठी थेट दुभाजकावरुन उडी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी निदर्शकांनी येत्या मंगळवारपर्यंत मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महाजन यांनी निदर्शने करणा-या कंत्राटी कामगारांना दिले.