वर्षानुवर्षेे सुरू असलेला वाद संपल्याने स्वागत: गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:43 AM2019-11-10T01:43:07+5:302019-11-10T01:43:30+5:30
अयोध्या जागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही समाजाला मान्य असणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा संपलेला आहे. देशात एकत्रित एकसंघ राहायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहावे, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
पंचवटी : अयोध्या जागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही समाजाला मान्य असणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा संपलेला आहे. देशात एकत्रित एकसंघ राहायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहावे, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवार (दि.९) सकाळी निकाल जाहीर केल्यानंतर भाजपाच्या वतीने महाजन यांनी काळाराम मंदिरात येऊन प्रभूरामचंद्रांचे दर्शन घेत त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. न्यायालयाने दिलेला निकाल कोणाचा जय-पराजय नाही अयोध्येचा विषय अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट होता. आज अतिशय ऐतिहासिक चांगला महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, निर्णयाचे सर्व समाजात स्वागत केले जात आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोणीही दुखावणार नाही, असा निर्णय दिला आहे. सर्व नागरिकांनी समाजात सद्भाव ठेवावा, देशात एकत्रित एकसंघ राहण्यासाठी व देशाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे महाजन शेवटी म्हणाले.
राज्यात पुन्हा
‘रामराज्य’ येणार !
शिवसेना-भाजप युती सत्ता स्थापनेवरून अंतर्गत कलह सुरू झाल्याने राज्यात सत्तास्थापनेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यातच शनिवारी महाजन यांनी राममंदिरात भेट दिली. राज्यात रामराज्य यावे म्हणून रामाला साकडे घातले का अशी विचारणा पत्रकारांनी महाजन यांना केली. त्यावर महाजन यांनी राज्यात रामराज्य येणार आहे. थोडी वाट बघा लवकरच सर्व कळेल, असे सांगितले.