साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करणार गिरीष महाजन; अनिकेतशास्त्री, सुधीरदास बैठकीपासून दूर
By संकेत शुक्ला | Updated: March 28, 2025 22:02 IST2025-03-28T22:02:09+5:302025-03-28T22:02:41+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २८) साधू-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले.

साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करणार गिरीष महाजन; अनिकेतशास्त्री, सुधीरदास बैठकीपासून दूर
नाशिक : मागच्या कुंभमेळ्यात शेकडो मंडलेश्वरांना जागेअभावी साधुग्रामपासून दूर राहावे लागले होते. यंदा तसे होऊ नये, म्हणून साधुग्रामसाठी जादा जागा संपादित करण्याची मागणी साधुंनी केल्यानंतर सिंहस्थापूर्वीच साधुग्रामसाठी पुरेशी जागा संपादित करण्याचे आश्वासन कुंभमेळामंत्री गिरीष महाजन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २८) साधू-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांसह, आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तिचरणदास महाराज यांसह साधू-महंत उपस्थित होते. प्रारंभीच भक्तिचरणदास महाराज यांनी नाशिकमधील भूसंपादनासह शाही मार्ग, गोदावरी प्रदूषण याबाबत प्रश्न उपस्थित केले. मागील सिंहस्थात शेकडो मंडलेश्वरांना जागा नसल्याने साधुग्रामपासून दूर वास्तव्य करावे लागले होते. त्यामुळे यंदा तरी त्यांना पुरेशी जागा देण्यासाठी जादा जागेचे भूसंपादन करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रत्येक कुंभात जागा संपादन करीत भाडे देण्यापेक्षा जागा अधिग्रहण करा, आता नाही तर पुढील सिंहस्थात जागा अजिबात उपलब्ध होणार नाही आणि प्रशासनालाही ते शक्य होणार नाही, असा इशारा यावेळी महंतांनी दिला. गोदावरीचे प्रदूषण दूर करून नदी वाहती राहील, अशी व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सर्वच प्रमुख महंतांनी चर्चेत सहभाग घेतला.
मुख्यमंत्र्यांसह नाशिकच्या साधुंची लवकरच बैठक...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यात त्र्यंबक येथे साधुंची भेट घेतली, परंतु नाशिकच्या साधूंना वेळ दिला नाही, असा सूर निघाल्यानंतर लवकरच अशी भेट घडवून आणली जाईल, असे आश्वासन गिरीष महाजन यांनी दिले.
सुधीर पुजारी, अनिकेतशास्त्री अनुपस्थित
महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेतशास्त्री देशपांडे यांचा आखाड्यांशी कोणताही संबंध नसून त्यांना आखाड्याच्या बैठकांपासून दूर ठेवण्याची मागणी आखाड्यांतर्फा करण्यात आली होती, त्यामुळे या बैठकीत त्या दोघांचीही बैठकीला उपस्थिती नसल्याचे दिसून आले.