नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनच राहणार?; बैठकीमुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 20:58 IST2025-02-28T20:49:02+5:302025-02-28T20:58:40+5:30
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याची आढावा बैठक बोलवली होती.

नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनच राहणार?; बैठकीमुळे चर्चांना उधाण
BJP Girish Mahajan : महिना उलटूनसुद्धा नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, नुकत्याच कुंभमेळ्यासंदर्भात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केवळ जलसंपदा आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनाच निमंत्रित करण्यात आले, तसेच नाशिकमधील अन्य तीन मंत्र्यांना निमंत्रण नसल्याचे सांगण्यात आल्याने पालकमंत्री महाजनच राहतील, असे संकेत भाजपकडून दिले जात आहेत.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याची आढावा बैठक बोलवली होती. या बैठकीला माजी पालकमंत्री आणि सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पालकमंत्रिपदावर दावा सांगणारे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, तसेच अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांना निमंत्रण नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर नाशिकमध्ये भाजपाचे पाच आमदार असताना एकालाही मंत्रिपद देण्यात आले नाही, तेव्हापासूनच गिरीश महाजन पालकमंत्रिपदासाठी नियुक्त होणार, अशी चर्चा होती. मात्र, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांची दावेदारी चर्चेत आली.
गेल्या महिन्यात नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्यानंतर महायुतीतील विरोधामुळे २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस दावोस येथून परतल्यानंतर हा तिढा सोडणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु अद्याप तिढा सुटलेला नाही. मात्र, कुंभमेळा पूर्वतयारी बैठकीला केवळ महाजन यांना निमंत्रण दिल्यानंतर गुरुवारी दिवसभर महाजन यांच्या नियुक्तीची चर्चा होती. महाजन हेच पालकमंत्री राहतील, असे सुतोवाच मात्र करण्यात आले.
अन्य शक्यता कोणती?
नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना कुंभमेळामंत्री घोषित करण्यात आले आहे. आता कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्यात येणार असून, त्यामार्फत सिंहस्थाची सर्व कामे केली जाणार आहेत. त्यामुळे सिंहस्थाचे एकूण सर्वच बजेट आणि कामे या प्राधिकरणाला देऊन महाजन यांच्या आधिपत्याखाली प्राधिकरण काम करेल आणि पालकमंत्री म्हणून अन्य कोणाचा विचार होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.