उपोषण मागे घेण्याची अण्णांना विनंती करणार- गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 10:47 AM2019-01-31T10:47:54+5:302019-01-31T10:49:10+5:30
त्र्यंबकेश्वर येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अण्णांनी सुरू ठेवलेल्या उपोषणावर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, या वयात अण्णांना उपोषण झेपणार नाही. त्यामुळे अण्णांनी तात्काळ उपोषण सोडावे, अण्णा हजारे यांचं उपोषण मागे घेण्यासाठी मी पुन्हा त्यांची भेट घेणार असल्याचंही गिरीश महाजनांनी सांगितलं आहे. शिवसेना-भाजपाच्या होऊ घातलेल्या युतीवर ते म्हणाले, शिवसेना-भाजपाची युती व्हावी अशी खालपासून वरपर्यंत सर्वांचीच इच्छा आहे, शिवसेनेच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी, यासाठी निवृत्तीनाथांचा चरणी प्रार्थना केली. तसेच राज्यासमोरील दुष्काळाचं संकट दूर व्हावे, असं निवृत्तीनाथांना साकडं घातलं आहे. वारकऱ्यांचे भोंगे बंद करणाऱ्या नाशिकच्या पोलिसांना जाब विचारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. श्रीसंत सदगुरू निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी स्थळाचे दर्शन घेण्याच्या ओढीने पायी दिंडी सोहळ्यात दाखल होऊन त्र्यंबकेश्वरची वाट तुडवत येणा-या वारकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे. कुशावर्तावर दशमी एकादशी या दिवशी आपापल्या शरीराला सोसवेल तशी कुशावर्ताच्या थंडगार पाण्याने वेळ मिळेल त्याप्रमाणे आंघोळी करीत आहेत. कुशावर्त परिसरात वासुदेव मंडळी आपल्या पितरांच्या नावाने दान पावतात. म्हणजे दान घेऊन उद्धार करतात. त्र्यंबक नगरपरिषद व श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने हार-फुले तर गजानन महाराज संस्थानतर्फे उपरणे देऊन दिंड्यांचे स्वागत प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येक दिंडी प्रमुखाचा सत्कार स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिंडी कुठून आली, गाव तालुका व जिल्ह्या बरोबरच दिंडीत किती वारकरी आहेत, महिला पुरुष याबाबतची माहिती लिहून घेतली जात आहे.