‘मॅट्रीमोनियल’वरून तरुणीला दीड लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:40 AM2018-09-16T00:40:54+5:302018-09-16T00:41:24+5:30
मॅट्रीमोनियल वेबसाइटचा बाजार दिवसेंदिवस वाढत असला तरी या बाजारात काही खोट्या संकेतस्थळांचाही शिरकाव झाल्याचे नाकारता येत नाही. ‘भारत मॅट्रीमोनियल’ नावाच्या विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावरून एका युवतीला भामट्याने विवाहचे आमिष दाखवून चक्क दीड लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : मॅट्रीमोनियल वेबसाइटचा बाजार दिवसेंदिवस वाढत असला तरी या बाजारात काही खोट्या संकेतस्थळांचाही शिरकाव झाल्याचे नाकारता येत नाही. ‘भारत मॅट्रीमोनियल’ नावाच्या विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावरून एका युवतीला भामट्याने विवाहचे आमिष दाखवून चक्क दीड लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील संकेतस्थळावरून माहिती घेत संशयित विजयकुमार नावाच्या भामट्याने इंदिरानगरमधील शांती पार्कमध्ये राहणाºया एका ३१वर्षीय तरुणीसोबत संपर्क साधला. व्हॉट््सअॅप क्रमांक व ईमेल आयडी प्राप्त करून घेतल्यानंतर त्या भामट्याने तरुणीसोबत संपर्क वाढवून विवाहाचे आमिषही दाखविले आणि तिचा विश्वास जिंकला. विवाह जुळविण्यासाठी येत असल्याचे सांगत त्याने महत्त्वाचे कागदपत्रे व ३७ हजार डॉलर असलेली बॅक कतार या देशातून सोडवायची असल्याचे सांगितले. त्यासाठी त्या युवतीला त्याच्या बॅँक आॅफ इंडियामधील बचत खात्यात १ लाख ६७ हजार ७०० रुपये भरणा करण्यास सांगितले.
युवतीने त्याच्या आमिषाला बळी पडून बॅँक खात्यात रकमेचा भरणा केला. त्यानंतर भामट्याने तिच्यासोबतचा सर्व प्रकारचा संपर्क बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन सगळा प्रकार कथन केला. इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.