इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार; परिसरात भीतीचे वातावरण
By प्रसाद गो.जोशी | Updated: January 30, 2024 16:23 IST2024-01-30T16:23:12+5:302024-01-30T16:23:34+5:30
मीनाक्षी शिवराम झुगरे असे ३१ वर्षीय तरुणीचे नाव

इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार; परिसरात भीतीचे वातावरण
इगतपुरी (गणेश घाटकर) : तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात निशाणवाडी ( त्रिंगलवाडी ) येथील तरुणी ठार झाली आहे. मीनाक्षी शिवराम झुगरे (३१) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी पहाटे त्रिंगलवाडी येथे राहणारी ही तरुणी घरातून बाहेर पडली असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी पंचनामा केला आहे. यानंतर मृतदेह इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तीन पिंजरे लावण्यात आले आहेत.