‘ब्लॅकमेलिंग’मुळे तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:39 AM2019-06-04T01:39:13+5:302019-06-04T01:39:50+5:30
गंगापूररोडवरील एका वीसवर्षीय तरुणीने एका ३८ वर्षीय शिवाजी प्रभाकर केदारे (रा.नाशिकरोड) नावाच्या व्यक्तीकडून लग्नासाठी होणाऱ्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आली आहे.
नाशिक : गंगापूररोडवरील एका वीसवर्षीय तरुणीने एका ३८ वर्षीय शिवाजी प्रभाकर केदारे (रा.नाशिकरोड) नावाच्या व्यक्तीकडून लग्नासाठी होणाऱ्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत युवतीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित केदारेविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन गोदापार्क परिसरातील बापू पुलावरून रोशनी दिलीप हिरे (२०, गंगापूररोड) या युवतीने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२) घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केदारेविरुध्द सोमवारी फिर्यादी मनीषा दिलीप हिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशनीचा विवाह या महिन्याच्या २० तारखेला होणार होता; मात्र शिवाजीला ही बाब खटकल्याने तो लग्नासाठी रोशनीवर दबाव वाढवित होता. त्याने तिच्या काही छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. तसेच तीच्या आईवडीलांना मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. केदारे हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ज्या मुलाशी तिचा विवाह होणार होता, त्या मुलालाही त्यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यामुळे तीचा होणारा विवाह धोक्यात आला. परिणामी केदारेच्या जाचाला कंटाळून आणि आलेल्या नैराश्यापोटी अखेर रोशनीने जीवनयात्रा संपविली. तीने रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गोदापात्रात उडी घेतल्याने तीचा मृत्यू झाला होता. गंगापूर पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सोमवारी रोशनीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन हकिगत सांगितली असता पोलिसांनाही धक्का बसला. केदारेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यास अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.
यापूर्वीही दोनदा मोडला विवाह
रोशनीचा विवाह यापूर्वीही दोन वेळा जमला होता; मात्र केदारे याच्या प्रतापामुळे दोन्हीही वेळा तिचा विवाह मोडला. तिसऱ्यांदा मोठ्या मुश्किलीने तिचा विवाह कुटुंबीयांनी जमवून आणला असता पुन्हा संशयित केदारे याने खोडा घालत होणाºया वर मुलाला भेटून खोटे सांगत विवाह मोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. केदारे हा विवाह समारंभात फटाके पुरविण्याचे काम करतो व तो विवाहित असल्याचे समजते.