पूर्वांचलच्या मुलींना मिळतेय मायेची ऊब

By admin | Published: August 21, 2016 01:11 AM2016-08-21T01:11:30+5:302016-08-21T01:11:46+5:30

जनकल्याणचा उपक्रम : वीस वर्षांपासूनचे सेवाव्रत, शिक्षणासह संस्काराची जबाबदारी

The girls in the east are getting bored | पूर्वांचलच्या मुलींना मिळतेय मायेची ऊब

पूर्वांचलच्या मुलींना मिळतेय मायेची ऊब

Next

संजय पाठक नाशिक
फुटीरवाद, अशांतता आणि त्यातच उर्वाेत्तर भारतात असलेली अनास्था या पार्श्वभूमीवर उपेक्षित राहिलेल्या पूर्वांचल क्षेत्रातील मुलींचे पालकत्व स्वीकारून या मुलींना मायेची ऊब देण्याचे काम नाशिकमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार करीत आहे. विशेष म्हणजे या मुलींचे करिअर घडवून त्यांना त्यांच्याच प्रांतात स्थायिक होण्यासाठी पाठवले जात असल्याने पूर्वांचलात रोजगाराचा प्रश्न सुटतोच, शिवाय उपेक्षेची भावना कमी करून एकात्मतेची भावना रूजवण्यास मदत केली जात आहे.
देशाच्या पूर्वोत्तर भागातील आसाम, अरुणाचल, मेघालय, नागालॅँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना सप्तभगिनी म्हणून ओळखले जाते. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीम राज्य त्याला जोडून ‘अष्टलक्ष्मी’ असा या क्षेत्राचा गौरवाने उल्लेख केला. चीन, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सीमारेषेवर असलेल्या या राज्यातील अस्थिरता आणि उपेक्षेची भावना असते. या राज्यात अन्य ठिकाणहून येणाऱ्यांना आप इंडीया से आये है...असा प्रश्न करण्यामागेच या प्रदेशांची कमालीची झालेली उपेक्षा आणि फुटीरतावादाचीच तीव्र भावना असते. ती कमी करण्यासाठी आणि मुख्यत्वे त्यांना मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करीत आहे. त्याअतंर्गत गेल्या वीस वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता या मुलींची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारून त्यांचा सांभाळ केला जातो.
मेघालय हे भारतातील एकमेव मातृसत्ताक राज्य. येथील खासी आणि जयंतिया भागातील १२ मुली सध्या नाशिकमध्ये संघाच्या उपक्रमांतर्गत शिक्षण घेत आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात संघाच्या वतीने त्यांची निवासव्यवस्था केली असून, मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. इयत्ता तिसरी ते दहावी या वर्गाकरिता त्यांची शैक्षणिक व्यवस्था करण्यात आली असून, या मुलींची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी एक सेवाव्रती दाम्पत्य मुलींसमवेत राहून त्यांचे आई-बाबा होऊन रहातात आणि मायेने काळजी घेतात. नाशिकमधील अनेक कुटुंबे या प्रकल्पाशी जोडली गेली असून, दिवाळी दसरा गणेशोत्सव अशा विविध सणांना मुली वेगवेगळ्या कुटुंबात जात असतात. शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे असल्याने त्यांच्यातील उपेक्षेची भावना दूर व्हावी आणि फुटीरतेचा चुकूनही विचार त्यांच्या मनात येऊ नये, यादृष्टीने सर्व कुटुंब त्यांच्याशी आपुलकीनेच वागतात आणि त्यांना आपल्यातीलच एक असल्याची जाणिव करून देतात. सहाजिकच शिकून पुन्हा आपल्या प्रदेशात गेलेल्या या मुली कुटूंबासह आणि समाजातही फुटीरतेऐवजी अखंडतेचे विचार रूजावतात.
सध्या नाशिकच्या प्रकल्पात मायसेलीन, स्टेफलीन, इबालदी, किनीटा, थायसेटीव्ह, युनीटी, डफी, बेलीना, रिकूट सॅनी, बालाव्यंकटूडू यांच्यासह एकूण बारा मुली नाशिकमध्ये शिक्षण घेत आहेत. येथील भाषा-संस्कृती, अन्न, शिक्षणाशी त्यांनी जुळवून घेतले असून त्या मराठीही बोलतात. शिक्षणात तर त्या अव्वल आहेच, शिवाय गेल्यावर्षी एका मुलीने दहावीत मराठीत ९० टक्के गुण मिळवून मराठी विद्यार्थ्यांना लाजवले आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या या मुलींना संस्कृत श्लोक, अथर्वशीर्षापासून पसायदानही येते. दररोज सायंकाळी प्रार्थना करताना त्या खासीमध्ये निसर्गाची पूजाही बांधतात. अनेक जणी आवडीने येथील खाद्य पदार्थ आणि पुरणपोळ्याही बनवायला शिकल्या आहेत. नाशिकच्या वातावरणात सहज रूजलेल्या या मुलींच्या कलागुणांना वाव दिला जातो. विद्या प्रबोधीनीच्या मुलीच्या फुटबॉल संघात या बारा पैकी सात जणींचा समावेश आहे. त्यांना मराठीपासून अन्य सर्व विषयांच्या शिकवण्याही लावल्या जातात. शिक्षण पूर्ण झाले की, त्यांच्या इच्छेनुसार महाविद्यालयीन शिक्षण मात्र त्यांच्या पालकाच्या आर्थिक पाठबळावर करावे लागते. महाराष्ट्रात पुणे चिपळूणसह अनेक ठिकाणी या मुलींच्या निवास आणि अन्य व्यवस्था मात्र संघ परिवाराकडून केली जाते, असे प्रकल्पाचे प्रमुख देविदास (बापू) जोशी व जितेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
जनकल्याण समितीच्या माध्यमातून राबविला जाणारा हा प्रकल्प गेल्या वीस वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. समाजपुरुषाच्या मदतीने सुरू असलेल्या या उपक्रमात गेल्या वीस वर्षांत या प्रकल्पात शिक्षण घेणाऱ्या अनेक मुली पुढे डॉक्टर, वकील, शिक्षिका, परिचारिका म्हणून शिक्षण घेऊन पुन्हा मेघालयात कार्यरत आहेत.जनकल्याण समितीचे बापु जोशी, नीळकंठ पिसोळकर, मंगला सवदीकर, हर्षल चिंचोरे,प्रकाश देशमुख, दिनकर वैद्य, मदन भंदूरे, संजय चंद्रात्रे, अशोक खोडके, अजय लगड, अरूण पहिलवान, पुष्कर पाठक, माधूरी जोशी, सुनंदा ढवळे, भीमराव गारे, गिरीश वैशंपायन, सेवाव्रती साधना निळेकर हे या प्रकल्पाची धूरा सांभाळत आहेत. महाराष्ट्रात पूर्वाेत्तर राज्यातील मुलींचे असे १४ ठिकाणी शैक्षणिक प्रकल्प असून, सुमारे अडीचशे मुले-मुली प्रकल्पातून शिक्षण घेऊन मूळ प्रवाहाशी जोडले जात आहे.

Web Title: The girls in the east are getting bored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.