शाहरूखच्या भेटीसाठी मुलींनी गाठले ‘मन्नत’
By admin | Published: May 25, 2017 01:49 AM2017-05-25T01:49:56+5:302017-05-25T01:50:09+5:30
नाशिक :नाशिकमधील एकाच कुटुंबातील सहा अल्पवयीन मुलीही शाहरूखला पाहण्यासाठी घरातील कुणालाही न सांगताच रेल्वेने त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर जाऊन पोहोचल्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चित्रपटातील हिरो-हिरोइन यांचे आकर्षण केवळ युवावर्गालाच नाही तर लहानग्यांनाही आहे़ त्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या फॅन्सची तर बातच न्यारी़ त्याची एक झलक बघण्यासाठी मुंबईतील ‘मन्नत’ बंगल्याबाहेर फॅन्सची नेहमीच गर्दी असते़ नाशिकमधील एकाच कुटुंबातील सहा अल्पवयीन मुलीही शाहरूखला पाहण्यासाठी घरातील कुणालाही न सांगताच रेल्वेने त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर जाऊन पोहोचल्या़ घरातील सहाही मुली एकाचवेळी गायब झाल्याने पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली़ म्हसरूळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उत्तम पवार आणि महिला पोलीस शिपाई प्रिया विघे यांनी अथक मेहनत घेऊन अवघ्या २४ तासांत या मुलींना मुंबईहून ताब्यात घेतले अन् पालकांच्या स्वाधीन केले़ मूळचे गुजरातच्या सौराष्ट्रमधील; मात्र व्यवसायानिमित्त नाशिक शहरात स्थायिक झालेले दोघे भाऊ आपल्या कुटुंबीयांसह पेठ परिसरात राहतात़ या दोघा भावांना प्रत्येकी तीन मुली असून, त्यांचे वय १२ ते १५ च्या दरम्यान आहे़ या सहाही मुलींना चित्रपटातील हिरो-हिरोइनचे प्रचंड आकर्षण़ त्यातच आपल्या पालकांसोबत मुंबईला फिरण्यासाठी गेलेल्या या मुलींनी शाहरूखचा मन्नत हा बंगला देखील बघितलेला होता़ मंगळवारी (दि़ २३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास या सहाही मुली घरातून निघाल्या आणि त्यांनी थेट सप्तशृंग गड गाठला़
घरातून पलायन केलेल्या या अल्पवयीन मुली पहाटे चार वाजेच्या सुमारास दिंडोरी नाक्यावर आल्या व त्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्टेशनला पोहोचल्या़ यानंतर शताब्दी एक्स्पे्रसने दादर व तेथून बांद्रा येथील शाहरूखच्या मन्नत बंगल्याजवळ पोहोचल्या़; मात्र या कालावधीत मुली कोठे गेल्या असतील या चिंतेने पालकांना ग्रासले होते़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ही माहिती पोलीस आयुक्त, उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्तांना दिली होती़ पालकांनी मुली मुंबईला जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविल्याने पोलीस नाईक पवार व पोलीस शिपाई विघे यांना मुंबईला तपासासाठी पाठविण्यात आले़ यापूर्वी रेल्वे पोलीस, ठाणे, कसारा, कल्याण पोलीस ठाण्यास व्हॉट्सअॅपद्वारे मुलींचे फोटो पाठविण्यात आले होते़ पवार व विघे या दोघांनी रात्रभर मुंबईतील विविध बसस्थानके तसेच रेल्वेस्थानकांवर पाहणी केली़ यानंतर शाहरूखचे आकर्षण असल्याची माहिती मिळताच बांद्रा येथील मन्नत बंगल्यासमोर गेले असता तिथे या मुली आढळून आल्या़ त्यांनी या मुलींना ताब्यात घेऊन नाशिकला आणले़ यानंतर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी या मुलींचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा असे न करण्याचे सांगून पालकांच्या स्वाधीन केले़ या मुलींना पाहून पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते़ या कामगिरीमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा हांडोरे, पोलीस हवालदार माळोदे, देवरे, पोलीस शिपाई रेहेरे यांचा विशेष सहभाग होता़