...तर मुलींनी दुर्गावतार दाखवावा - आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:02 PM2018-08-25T18:02:38+5:302018-08-25T18:07:56+5:30
नाशिक : मुलांपेक्षा मुली नक्कीच अधिक बुद्धिवान असून, त्यांच्यात निर्णयक्षमता जास्त असते. त्यामुळे बाका प्रसंग ओढवल्यास मुलींनी घाबरून जाऊ नये, प्रतिकारासाठी धाडस करून स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोराला दाखवून द्यावा, असे आवाहन शिवसेना युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले.
शिवसेना युवा सेनेच्या वतीने शहरातील हनुमानवाडी लिंकरस्त्यावर एका लॉन्समध्ये आयोजित स्वसंरक्षण उपाययोजना वर्गाच्या समारोपप्रसंगी ठाकरे बोलत होते. मुलींवर होणा-या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी युवासेनेच्या वतीने त्यांना प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षणार्थ धडे देण्यात आले. यामध्ये हातातून हात निसटून सुटका करणे, हल्लेखोरांनी गळा दाबून धरला असल्यास तसेच दोन्ही हातांनी आवळून धरून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिकार करत त्याच्या तावडीतून कसे निसटावे, त्याने डोक्याच्या केसांना घट्ट धरून ठेवल्यास अन् धारधार शस्त्राचा धाक दाखविल्यास कसा प्रतिकार करावा, याबाबत तज्ज्ञ कराटे प्रशिक्षकांनी सुमारे तीन ते चार तास उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून धडे दिले. यावेळी शहरातील सुमारे दहा ते बारा शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी आदित्य म्हणाले, हल्लेखोरांच्या बाबतीत मुलींनी सतर्कता बाळगावी. बाका प्रसंग ओढवल्यास त्या हल्लेखोराच्या संवेदनशील अवयव उदा. डोळे, कान, नाक यावर आघात करण्याचा प्रयत्न करावा. यावेळी धीर धरावा आणि ‘बचाओ-बचाओ’चा आवाज अधिक जोरजोराने काढण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून लोकांचे लक्ष वेधले जाईल आणि हल्लेखोराच्या पोटातही भीतीचा गोळा उठेल. दरम्यान, आदित्य यांनी विद्यार्थिनींसोबत ‘सेल्फी’सेशनही केले. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, गटनेता विलास शिंदे, अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, सचिन मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुलींनी दाखविले प्रात्यक्षिक
प्रशिक्षक मेहुल वोरा, अनिल भोसले, जस्मीन मकवाना, संजय दरेकर या कराटे प्रशिक्षकांनी उपस्थित दहा ते बारा शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी प्रशिक्षकांनी सांगितलेल्या उपाययोजनांप्रमाणे मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक उपस्थित अन्य विद्यार्थिनींपुढे सादर केले. दरम्यान, काही मुलींनी प्रशिक्षण वर्गाविषयीचे मनोगतही व्यक्त केले.