गीता माळी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:03 AM2019-11-16T01:03:10+5:302019-11-16T01:03:43+5:30

शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते.

 Gita Mali's funeral in the bereaved environment | गीता माळी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

गीता माळी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

googlenewsNext

नाशिक : शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते. नाशिकचा हा स्वरपक्षी शुक्रवारी दुपारी अनंतात विलीन झाला.
मुंबईहून कारने परतताना गुरुवारी दुपारी अपघाती निधन झालेल्या गीता माळी यांच्यावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गीता यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिकच्या लहान-मोठ्या कलाकारांसह हजारो कलारसिक उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी गीता यांच्या सातपूर येथील निवासस्थानी कलाप्रेमी रसिकांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. गीता यांची अशी चटका लावून जाणारी वार्ता समजल्यापासून त्यांच्या निवासस्थानी अश्रुंचा महापूर वहात होता. सातपूरच्या निवासस्थानापासून निघालेली अंत्ययात्रा कालिदास कलामंदिरात आणण्यात आली. कालिदासमध्ये अंत्यदर्शन घेण्यासाठी उसळलेल्या गर्दीला कालिदासचे प्रांगणदेखील अपुरे पडले होते. कालिदासमध्ये नाट्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तिथे काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवून तिथून पार्थिव प. सा. नाट्यगृहात आणल्यानंतर सावानाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. नाशिक अमरधामला नेऊन अग्नीडाग देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, अविराज तायडे, मकरंद हिंगणे, दत्ता पाटील, प्रिया तुळजापूरकर, मोहन उपासनी, विनोद राठोड यांच्यासह शेकडो रंगकर्मी, कलाकार, जनस्थान ग्रुपचे सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. १९ नोव्हेंबरला सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात सर्व कलाकार, रसिकांच्या वतीने शोकसभा होणार आहे.
आॅर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे शोकसभा
कालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारापाशी शुक्रवारी सायंकाळी गीता यांच्या निधनाबद्दल जिल्हा आॅर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे शोकसभा घेण्यात आली. संघटनेचे संस्थापक उमेश गायकवाड, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सुनील ढगे यांनी गीता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोकभावना व्यक्त केल्या. गायकवाड यांनी गीता या उत्कृष्ट कलाकाराबरोबर उत्कृष्ट व्यक्ती असल्याचे सांगितले. गीताचा अपघाती मृत्यू हा काळजाला चटका लावणारा असल्याचे ढगे यांनी सांगितले. कारकिर्द ऐन बहरात असताना तिचे अकाली जाणे यावर विश्वासच बसत नसल्याचे जयंत पाटेकर म्हणाले. यावेळी वीरेंद्रसिग परदेशी, नंदू देशपांडे, रवी बराथे, विजय महंत, नवीन तांबट, राजेंद्र जाधव, प्रिति जैन, प्रदीप जगताप यांनीदेखील अनेक आठवणी ना उजाळा देत माळी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title:  Gita Mali's funeral in the bereaved environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.